
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले :
माण तालुक्यातील पळशी येथील एका तरुणाने बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या रागातून, चुलत भावाने आपल्या साथीदारांसह मिळून मेहुण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोंदवले बुद्रुक येथे घडली या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांनी त्याच्या खिशातील १ लाख रुपयेही लंपास केले आहेत.
नेमकी घटना काय?
फिर्यादी हणमंत लक्ष्मण दौंड (वय ३२, रा. पळशी) हे २४ एप्रिल रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत दुचाकीवरून गोंदवले ते म्हसवड रस्त्याने जात होते. ख्वाजा गरीब नवाज मटन शॉपच्या समोर आले असता, आरोपी गणेश तात्याबा ढोले याने त्यांना थांबवले. "माझ्या बहिणीला (भाग्यश्री) पळवून नेऊन लग्न का केले?" असा जाब विचारत गणेशने हणमंत यांच्या उजव्या बरगडीत चाकूने वार केला.
साथीदारांची मदत आणि लूटमार
यावेळी गणेशसोबत असलेल्या इतर ४ ते ५ अनोळखी इसमांनी हणमंत यांना पकडून ठेवले आणि त्यांच्या खांद्यावर, डोळ्याखाली चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. तसेच सोबत असलेल्या इतरांनाही मारहाण केली. हणमंत रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील १ लाख रुपये काढून घेऊन तिथून पळ काढला.
पोलीस कारवाई
या प्रकरणी हणमंत दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गणेश तात्याबा ढोले व इतर ५ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११९(२), १८९(२), १८९(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि दराडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. धोंगडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून प्रेमविवाहातून झालेल्या या हल्ल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
0 Comments