Ticker

6/recent/ticker-posts

लोणार वस्तीमध्ये भरदिवसा घरफोडी; तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा हात


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क | गोंदवले

मनकर्णवाडी (ता. माण) हद्दीतील सातारा–पंढरपूर मार्गालगत असलेल्या लोणार वस्ती येथे दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून म्हसवड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

लोणार वस्तीतील अंगणवाडी सेविका कोमल राहुल गेंड या सकाळी सुमारे ९ वाजता कामासाठी बाहेर गेल्या असताना घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा कटरने कापून घरात प्रवेश केला.

सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात पाहणी केली असता कपाट फोडून सर्व वस्तू अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याचे आढळले. तसेच तुटलेले कुलूप घरातील पोत्यावर ठेवलेले असल्याचेही निदर्शनास आले.



या घरफोडीत गंठण, मिनी मंगळसूत्र आणि कर्णफुले असा अंदाजे तीन तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश गेंड यांनी म्हसवडचे अतिरिक्त प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, श्वान पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली तर फॉरेन्सिक पथकाने काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.



दरम्यान, सातारा–लातूर मुख्य मार्गालगतच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी शेळ्यांची चोरी झाली होती आणि त्या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यामुळे स्थानिकांकडून पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत. 


Post a Comment

0 Comments