सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: ज्योतिर्लिंग यात्रा अन हनुमान जयंतीनिमित्त कुकुडवाड येथे भरलेल्या कुस्ती मैदानात सिकंदर शेख याने हरियाणाच्या सुमित कुमारला चितपट करत मानाची गदा पटकावली. अवघ्या चार मिनिटांत बॅक थ्रो डावाने विजय मिळवत त्याने ३ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले.
कुकुडवाड येथे पार पडलेल्या या कुस्ती मैदानाला मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अन हरियाणा केसरी सुमित कुमार यांच्यातील मुख्य लढत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली होती.
लढतीच्या सुरुवातीपासूनच सिकंदर शेखने आक्रमक खेळ दाखवत सुमित कुमारला बचावात्मक खेळण्यास भाग पाडले. अखेर अवघ्या चार मिनिटांत अचूक बॅक थ्रो डाव साधत सुमित कुमारला चितपट केले. या विजयाने मैदानात एकच जल्लोष झाला.
मैदानात अन्यही चुरशीच्या कुस्त्या रंगल्या. विविध गटातील मल्लांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रत्येक लढतीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वेळी गावातील स्केच आर्टिस्ट नम्रता काटकर हिने सिकंदर शेख याचे हस्तरेखीत चित्र तयार करून त्याला भेट दिले. हे पाहून सिकंदर शेख भावूक झाला. या अनोख्या सन्मानामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
कुकुडवाड येथील या कुस्ती मैदानामुळे पारंपरिक खेळाला चालना मिळाली असून तरुणांमध्ये कुस्तीबद्दल उत्साह वाढत असल्याचे चित्र दिसून आले. आयोजकांनीही मैदानाचे उत्तम नियोजन केले होते.
या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कुस्तीप्रेमींसाठी हा सोहळा संस्मरणीय ठरला.

0 Comments