सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कोरेगाव: अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गंभीर प्रकरणात तब्बल एक महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी सैनिकांनी शुक्रवारी भारत माता की जय....च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत शहरातील सुभाषनगर परिसरात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
माजी सैनिक लक्ष्मण नवनाथ जगताप यांच्या १७ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीचे दि. ११ मार्च २०२६ रोजी अतिश मुकुंद जावळे याने एकतर्फी प्रेमातून कोयत्याचा धाक दाखवत अपहरण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दि. १२ मार्च रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, महिनाभर उलटूनही ना आरोपी अटकेत, ना मुलीचा ठावठिकाणा लागला. यामुळे माजी सैनिकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, हवालदार राहुल कुंभार आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांनी जाणीवपूर्वक तपासात हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक व जगताप कुटुंबीयांनी केला आहे. तपास मुद्दाम रखडवला जात असून कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला जात आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, माजी सैनिकांच्या वाढत्या दबावानंतर पोलीस अधीक्षकांनी तपास साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. मात्र, तेथेही कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने संताप अधिकच तीव्र झाला आहे. हा निष्क्रियपणा की संगनमत? असा थेट सवाल माजी सैनिकांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर सैनिक हो... जागे व्हा, एकजुटीचा धागा व्हा!... भारत माता की जय.... अशी हाक देत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गृहराज्यमंत्री योगेश कदम हे कराड दौऱ्यावर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी या तेथे गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत वाचक पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांनी निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि तेरणी यांना तातडीने माहिती देण्याचे आश्वासन दिले.
यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालय गाठले. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन देऊन पोलिसांच्या कारभाराचा जाब विचारण्यात आला.
या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील माजी सैनिक, सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी आणि शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी रेजिमेंटची कॅप, कोट व पदके परिधान करून आंदोलनात सहभाग नोंदवला.
माजी सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रशांत कदम आणि कोरेगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक नलावडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सीमेवर देशासाठी लढलो, पण आज आमचेच कुटुंब भयाच्या छायेखाली आहे. पोलिसांकडून सहकार्याऐवजी भावनांची पायमल्ली होत आहे, असा तीव्र आरोप केला.
यावेळी त्यांनी मोबाईल वरून कराड दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संपर्क साधून निवेदन सादर केले आहे. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर आक्रोश मोर्चा, रास्ता रोकोसारखे तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, संपूर्ण प्रकरणामुळे कोरेगाव तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे.


0 Comments