Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा आरोप



सातारा:  सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत नसून ‘दडपशाही’ आणि ‘प्रशासकीय हस्तक्षेप’ यांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत आपल्याकडे स्पष्ट बहुमत होते, हे सर्वांना ठाऊक असूनही वेगळी समीकरणे निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली होती आणि सदस्यांच्या भूमिकेनुसारच निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हीप मोडणाऱ्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दोन सदस्यांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करत देसाई यांनी भाजपवर टीका केली. “सत्ता मिळवली नाही, तर आमच्याकडून हिसकावली,” असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यालाही देसाई यांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप फेटाळून लावत त्यांनी सांगितले की, महायुतीतील सर्व हालचालींची माहिती आपण नियमितपणे देत होतो. चुकीचे ब्रीफिंग केल्याचा आरोप करणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करावेत, असेही त्यांनी आव्हान दिले.

याच वेळी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या यशाचाही त्यांनी आढावा घेतला. सुमारे १२ हजार पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतल्याने सव्वा कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात राज्यभर अशा महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी पर्यटन विभागाकडून अडीचशे कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments