Hot Posts

6/recent/ticker-posts

आठ महिने उलटले... सासपडेच्या आर्याला न्याय कधी? सरकारी वकील नेमला, आता खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा; आर्याच्या आई-वडिलांसह आजी-आजोबांची आर्त हाक

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी न्यायालयाने अल्पावधीत निकाल देत दोषीला कठोर शिक्षा सुनावल्याने राज्यभर समाधान व्यक्त होत आहे. मात्र, सातारा तालुक्यातील सासपडे येथील १३ वर्षीय आर्या सागर चव्हाण हिच्या निर्घृण हत्येला आठ महिने उलटूनही न्यायालयीन प्रक्रियेला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्यामुळे आर्याच्या आई-वडिलांसह आजी-आजोबांनी शासन आणि न्यायव्यवस्थेकडे भावनिक साद घालत, "सरकारी वकील नेमण्यात आला आहे. आता हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आमच्या मुलीला लवकर न्याय द्या," अशी आर्त मागणी केली आहे.

अशी घडली होती घटना...

११ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळेतून घरी परतल्यानंतर आर्या चव्हाण हिच्यावर शेजारी राहणारा राहुल बबन यादव (वय ३५) याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आर्याने प्रतिकार केल्याने आरोपीने तिच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी तपासात नोंदविला. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत तपासाची सूत्रे हलवून आरोपी राहुल यादव याला अटक केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर दगडफेक व तोडफोड केली होती. गावासह संपूर्ण जिल्ह्यात निषेध मोर्चे निघाले आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

"आम्हाला फक्त न्याय हवा"

आर्याचे वडील, आई आणि आजी-आजोबा आजही त्या काळ्या दिवसाच्या आठवणींनी व्याकूळ होतात. "आमची मुलगी परत येणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. पण तिचा जीव घेणाऱ्याला कठोर शिक्षा झाली, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. आम्हाला कोणतीही मदत नको, फक्त न्याय हवा," अशी त्यांची भावना आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या खटल्यासाठी सरकारी वकील नेमण्यात आला आहे. मात्र, सुनावणी जलदगतीने होऊन साक्षी-पुरावे लवकर पूर्ण व्हावेत आणि दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

आठ महिन्यांनंतरही एकच प्रश्न...

आर्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त झाला होता. सामाजिक संघटना, महिला संघटना आणि ग्रामस्थांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, आठ महिने उलटूनही अंतिम निकाल लागलेला नाही.

नसरापूरच्या चिमुरडीला जलदगतीने न्याय मिळू शकतो, तर सासपडेच्या आर्यालाही तोच न्याय कधी मिळणार? हा प्रश्न आज तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण सातारा जिल्हा शासन आणि न्यायव्यवस्थेला विचारत आहे.

Post a Comment

0 Comments