हर घर जल योजना दोन महिन्यांपासून बंद; ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघातील गंभीर वास्तव
पळशी (ता. माण) | प्रतिनिधी
माण तालुक्यातील सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या पळशी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, संपूर्ण गावासाठी शासनाकडून केवळ दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत अपुरा ठरत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पळशीमध्येही पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. 'हर घर जल' योजनेअंतर्गत लोधावडे येथील तलावाजवळ विहीर खोदून पळशीला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, ही योजना गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडल्याने गाव पुन्हा टँकरवर अवलंबून राहिले आहे.
गावात सुरू असलेल्या चर्चेनुसार, या योजनेचे वाढलेले वीजबिल ग्रामपंचायतीला भरणे शक्य नसल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, एवढी गंभीर परिस्थिती असतानाही लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. शासनाने तातडीने अतिरिक्त टँकर उपलब्ध करून द्यावेत तसेच बंद पडलेली हर घर जल योजना त्वरित सुरू करून गावाची कायमस्वरूपी पाणी समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments