Ticker

6/recent/ticker-posts

जमीन विक्रीनंतर पुन्हा पैशांची मागणी; खासदार उदयनराजेंच्या नावाचा गैरवापर करून धमकावल्याचा आरोप

 


पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील व्यवहारावरून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा; संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार, कथित खोट्या वृत्ताविरोधात कायदेशीर नोटीस

सातारा | प्रतिनिधी : पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील जमीन व्यवहारातून विक्रेत्यांकडून पुन्हा मोठी रक्कम उकळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. जमीन व्यवहार कायदेशीर पद्धतीने पूर्ण झालेला असतानाही जमिनीचे बाजारमूल्य वाढल्याचे कारण पुढे करून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला असून, याप्रकरणी संबंधितांविरोधात सातारा व मेढा पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात योगेश चोरगे, युवराज पवार आणि विनीत विलास पाटील यांच्यासह काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच काही माध्यमे व एआयच्या माध्यमातून कथित खोट्या बातम्या प्रसारित करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित पोर्टलला याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जमीन विकली, भाव वाढला अन् पुन्हा पैशांची मागणी?

पुणे आणि मुंबईतील नागरिकांना पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील जमीन विकल्यानंतर काही काळाने जमिनीचे दर वाढल्याचे कारण देत पुन्हा पैसे मागण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या, विशेषतः खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा गैरवापर करून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असून त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे अॅड. पाटील-ठोंबरे यांनी म्हटले आहे. व्यवहार कायदेशीर असताना दबाव, धमक्या आणि माध्यमांद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.

पोलिसांकडे कागदपत्रांसह तक्रार

याप्रकरणी सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मेढा पोलीस ठाण्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रांसह तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अशाच प्रकारे जमीन व्यवहारानंतर कोणाकडून अतिरिक्त पैशांची मागणी किंवा धमकी दिली जात असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments