Hot Posts

6/recent/ticker-posts

बॅग कापून सातारच्या व्यापाऱ्याचे १७ लाखांचे दागिने लुटले

 


बसप्रवासात बॅगेची खालची बाजू कापून सोन्याच्या ११ साखळ्या व चांदीचा करगोटा लंपास

सातारा, दि. १७ : प्रतिनिधी

पुण्याहून साताऱ्याकडे बसने येणाऱ्या व्यावसायिकाच्या बॅगेची खालची बाजू कापून अज्ञात चोरट्यांनी १७ लाख १० हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. मोळाचा ओढा येथे बसमधून उतरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कालुसिंह जीवसिंह देवल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव पेठ, सातारा येथे राहणारे देवल हे मंगळवारी (दि. १३) दागिन्यांच्या खरेदीसाठी पुण्याला गेले होते. तेथील एका सराफी पेढीतून त्यांनी १६ लाख ९९ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ११ साखळ्या आणि ११ हजार ५०० रुपये किमतीचा चांदीचा करगोटा खरेदी केला. खरेदी केलेला ऐवज बॅगेत ठेवून ते रिक्षाने स्वारगेट बसस्थानकावर आले. त्यानंतर बसने साताऱ्याकडे प्रवास सुरू केला.

सायंकाळी सातच्या सुमारास बस मोळाचा ओढा येथे आल्यानंतर ते खाली उतरले. यावेळी बॅग तपासली असता, तिची खालची बाजू दोन ठिकाणी कापल्याचे दिसून आले. बॅगेतील दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी चोरी झाल्याची खात्री केली.

बसप्रवासातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय आहे. देवल यांच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोवेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments