Hot Posts

6/recent/ticker-posts

तारळी नदी पुलाजवळ कारला आग; पोलीस ठरले देवदूत!

 


कोर्टीजवळ अपघातानंतर वाहनाने घेतला पेट; दोन पुरुष, महिला आणि दोन बालकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कोर्टी : उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोर्टी गावाजवळ तारळी नदीच्या पुलाशेजारी रस्त्यालगत असलेल्या कठड्याला कार धडकून अपघात झाला. या अपघातानंतर कारने अचानक पेट घेतला. वाहनात अडकलेल्या दोन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांना उंब्रज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एमएच १२ एचझेड ७००२ ही कोर्टी गावाजवळ तारळी नदीच्या पुलाच्या परिसरात रस्त्यालगत असलेल्या कठड्याला धडकली. धडकेनंतर कारने अचानक पेट घेतल्याने वाहनातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने पोलिसांनी कारला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वाहनात अडकलेल्या पाचही जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

या प्रसंगी उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय धुमाळ भोसले, वैभव डांगरे आणि जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय भोसले यांनी तातडीने मदतकार्य केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहनातील पाच जणांना सुरक्षित बाहेर काढता आले. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments