Hot Posts

6/recent/ticker-posts

कराडला बोगस डॉक्टरवर गुन्हा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: वैद्यकीय पदवी व आवश्यक परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता सुरेश थोरात यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भास्कर बंडू जाधव (रा. गजानन हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की एका रुग्णाने भास्कर जाधव याच्याकडून पोटदुखीसाठी सन २०१७मध्ये होमिओपॅथी औषधे घेतली होती. ते औषध खाल्ल्यापासून त्यांना गंभीर शारीरिक व्याधी जडल्या असून, त्यांच्यावर आजही उपचार सुरू असल्याची तक्रार जिल्हा आरोग्यअधिकारी यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीनुसार शहानिशा करण्यासाठी तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीमध्ये सचिव म्हणून डॉ. सुनीता थोरात कार्यरत आहेत. सहा ऑक्टोबरला डॉ. थोरात यांनी गजानन हौसिंग सोसायटीतील सोनहिरा बंगला परिसरात संबंधित डॉक्टराच्या वैद्यकीय व्यवसायाची तपासणीसाठी तेथे छापा टाकला. यावेळी आवश्यक वैद्यकीय पदवी व व्यवसाय करण्याची परवानगी नसतानाही संबंधित व्यक्ती वैद्यकीय उपचार करत असल्याचे आढळून आला. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments