सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज: ऊस परिषदेमध्ये जाहीर झालेला ऊसदर मिळाल्याशिवाय खटाव तालुक्यातील कोणत्याही साखर कारखान्याची ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पावित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार आणि खटाव तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या ऊस फडात उतरून ऊस वाहतूक रोखण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ऊस वाहतूक आणि ऊसतोडी बंद पडल्या आहेत.
गोपुज, वाकळवाडी, नायकाची वाडी, निमसोड, अंबवडे, हिंगणे, डाळमोडी, चितळी आणि मायणी या भागांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असून, दराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय ऊस कारखान्याला पाठवू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.
यावेळी ऊस वाहतूकदारांना केवळ समज देऊन वाहतूक थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरू ठेवल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे यांनी दिला.
“आज आम्ही ऊस वाहतूकदारांना समज देत आहोत. मात्र, उद्या आंदोलन तीव्र झाले तर त्याची जबाबदारी संबंधित कारखाना प्रशासनाची असेल. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ऊस वाहतूक करू नका. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,” असा इशारा घार्गे यांनी दिला.
कारखाना प्रशासनाला इशारा!
सोनहिरा, अजिंक्यतारा, शिवनेरी, वर्धन (पडळ), खटाव, जरंडेश्वर यांसह संबंधित साखर कारखान्यांच्या प्रशासनाने ऊस परिषदेत जाहीर झालेल्या दराच्या प्रश्नावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
ऊसदराचा प्रश्न सुटेपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कारखान्यांच्या गव्हाण बंद पाडण्यापर्यंत आंदोलन नेण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे, या मागणीवर संघटना ठाम असून, दराबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
गावोगावी धडक मोहीम
हिंगणे परिसरात संतोष निकम, चितळी परिसरात अनिल कचरे, तर बनपुरी आणि येरळवाडी परिसरात युवक तालुकाध्यक्ष विजय देवकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
खातगुण आणी येळीव, उंबर्डे गोपूज, बनपुरी मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला आहे.

0 Comments