सत्य सह्याद्री/सातारा
गोडोली नाक्याजवळील पालवी हॉटेल परिसरात लहान पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शिवराज पेट्रोल पंपमार्गे कराड-कोल्हापूरकडे जाणाऱ्या तसेच याच मार्गाने कराड-कोल्हापूर बाजूकडून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना संबंधित रस्त्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे बदल २२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वाहतूक बदलांचे आदेश जारी केले आहेत.
असे असतील पर्यायी मार्ग
कराड-कोल्हापूर बाजूकडून सातारा शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी अजंठा चौक मार्गे गोडोली नाक्यावरून शहरात प्रवेश करावा. सातारा शहरातून कराड-कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी पोवई नाका–गोडोली नाका–अजंठा चौक या मार्गाचा वापर करावा.
अंतर्गत वाहतुकीसाठी अवजड वाहने वगळून अजंठा चौक–तलाठी कॉलनी–फॉरेस्ट कॉलनीमार्गे लिंबखिंड-खिंडवाडी रस्त्यावर जाता येईल. तसेच गोडोली चौक–पालवी चौक–गोळीबार मैदान–जगदाळे बागमार्गे लिंबखिंड-खिंडवाडी रस्त्याचाही पर्याय उपलब्ध असेल. या अंतर्गत पर्यायी मार्गांवर अवजड वाहनांना परवानगी नसणार आहे. कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन सातारा पोलीस दलाने केले आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून प्रवासाचे नियोजन करावे.

0 Comments