सयाजी शिंदे, विवेकानंद पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांचा प्रकल्पाला विरोध; शेतकऱ्यांचे पाणी आणि डोंगरावरील गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
मुरुड : तारळी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या अदाणी हायड्रो पॉवर अर्थात पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी मुरुड गावात शेकडो नागरिक एकत्र आले. 'अदानी हटवा, सह्याद्री वाचवा', 'तारळी खोरे वाचवा' अशा जोरदार घोषणा देत ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात आवाज उठविला. अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे, विवेकानंद पाटील आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनातून तारळी खोऱ्यातील पाणी, पर्यावरण आणि गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.
तारळी धरणातील पाणी पंप स्टोरेज प्रकल्पासाठी वापरण्यात आल्यास धरणग्रस्त आणि परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. शेतीसाठी आणि स्थानिकांच्या गरजांसाठी उपलब्ध असलेले पाणी प्रकल्पासाठी वापरले गेले, तर भविष्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार कसे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
केवळ पाण्याचाच प्रश्न नसून या प्रकल्पामुळे डोंगराळ भागातील गावांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदकाम आणि बांधकाम झाल्यास भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डोंगरावरील गावांचे अस्तित्व, घरे, शेती आणि नैसर्गिक पर्यावरण धोक्यात येण्याची भीती स्थानिक नागरिकांना वाटत आहे.
या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. सह्याद्रीचे जंगल, वन्यजीव आणि निसर्गसंपत्ती जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विवेकानंद पाटील यांनीही स्थानिकांच्या प्रश्नांना महत्त्व देत प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि आक्षेप गांभीर्याने विचारात घेण्याची भूमिका मांडली. स्थानिक कार्यकर्त्यांनीही प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे लक्ष वेधले.
दरम्यान, या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबरोबरच प्रकल्पाच्या खर्चात दाखविण्यात आलेल्या मोठ्या तफावतीचाही मुद्दा चर्चेत आहे. प्रकल्पाची किंमत ५ हजार ६७५ कोटी रुपयांवरून ५६.७५ कोटी रुपये दाखविल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य वन विभागाला दिल्याचे यापूर्वी समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहाराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
तारळी धरण हे केवळ वीज निर्मितीचे साधन नसून परिसरातील शेतकरी, धरणग्रस्त आणि गावकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण, डोंगराळ भागातील गावांची सुरक्षितता आणि सह्याद्रीच्या पर्यावरणाचा समतोल राखल्याशिवाय प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी स्थानिकांचे पाणी, पर्यावरण आणि गावांची सुरक्षितता पणाला लावली जाणार का? हा सवाल उपस्थित करत मुरुडमधील आंदोलनातून तारळी खोऱ्याचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता शासन आणि संबंधित कंपनी या नागरिकांच्या आक्षेपांवर काय भूमिका घेतात, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

0 Comments