लग्नाच्या विषयावरून दोघांत वाद; बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार, संशयित पोलिसांच्या ताब्यात
सातारा: प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाने कण्हेरमध्ये गंभीर वळण घेतले. तरुणीशी असलेले प्रेमसंबंध संपविण्यासाठी दबाव आणत एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला निर्जनस्थळी बोलावून त्याच्यावर बंदुकीतून गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री कण्हेर येथील आय.बी. क्रिकेट मैदानावर घडलेल्या या घटनेत विजय वाघमळे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे कण्हेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी विकास ज्ञानेश्वर वाघमळे (वय ३५, रा. गणेशनगर, कण्हेर) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नितीन बबन साबळे (रा. गणेशनगर, कण्हेर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५१(२), ३५१(३) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय वाघमळे आणि एका तरुणीच्या प्रेमसंबंधावरून नितीन साबळे याचा आक्षेप होता. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्याने विजयला कण्हेर गावाशेजारील वेळे-कामथी रस्त्यालगत असलेल्या आय.बी. क्रिकेट मैदानावर बोलावले. तेथे भेटल्यानंतर प्रतिक्षाशी असलेले प्रेमसंबंध संपविण्याचा आणि तिचे लग्न गावात होऊ न देण्याचा इशारा त्याने दिला. मात्र, विजयने आपण तिच्याशीच लग्न करणार असल्याचे ठामपणे सांगितले.
यामुळे संतप्त झालेल्या नितीनने पाठीमागे शर्टमध्ये लपविलेली बंदूक बाहेर काढली. विजयला जिवंत सोडणार नसल्याची धमकी देत त्याच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. संशयित नितीन साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
0 Comments