सातारा / प्रतिनिधी
मोळाचा ओढा परिसरात रविवारी (दि. १) दुपारी अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील झाडाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी दुभाजकाला धडकली. त्यामुळे चालक रस्त्यावर पडला असता, बाजूने जाणाऱ्या डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने ही दुर्घटना घडली. आबिद मुबारक शेख (वय २८, रा. सैदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबिद शेख हा एमएच ११ डीआर ७९६६ क्रमांकाच्या मोपेडवरून मोळाचा ओढा परिसरातून जात होता. त्याचवेळी बाजूने डंपर जात असताना दुभाजकातील झाड आडवे आल्याने ते वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची मोपेड दुभाजकाला धडकली. धडकेनंतर आबिद याचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या डंपरचे चाक त्याच्या कमरेवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर डंपरचालकाने वाहन थांबवले; मात्र घटनास्थळावरून तो पसार झाला. या प्रकरणी डंपर क्रमांक एमएच ११ सीजे ५०२० च्या चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात साजिद मुबारक शेख यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड करीत आहेत.
0 Comments