पती गंभीर जखमी; मुलासाठी वधू पाहायला आलेल्या मोटे दाम्पत्यावर काळाचा घाला
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
माण : नवी मुंबईतील कळंबोली येथे प्रवासी ट्रॅव्हल्स थांबलेली असताना कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात माण तालुक्यातील संगिता पोपट मोटे आणि ट्रॅव्हल्स चालक सरतापे यांचा मृत्यू झाला. या अपघातात संगिता मोटे यांचे पती पोपट मोटे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मोटेवाडी आणि पर्यंती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोपट मोटे आणि संगिता मोटे हे दाम्पत्य मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या निमित्ताने प्रवास करत होते. कळंबोली येथे मोटे यांचा सोने-चांदीचा व्यवसाय आहे. बुधवारी पहाटे ट्रॅव्हल्स थांबलेली असताना त्यातील साहित्य काढण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने ट्रॅव्हल्सला धडक दिली.
या धडकेत संगिता मोटे आणि ट्रॅव्हल्स चालक सरतापे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोपट मोटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
मुलाच्या विवाहासाठी वधू पाहण्याच्या उद्देशाने निघालेल्या मोटे दाम्पत्यावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने माण तालुक्यातील मोटेवाडी तसेच ट्रॅव्हल्स चालकाच्या पर्यंती येथील नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

0 Comments