Hot Posts

6/recent/ticker-posts

हे तर घडणारच होते !



अग्निशमन दलात लागल्यावर सुरुवातीची चार  वर्ष परेलमधेच रहायला होतो . दोन वर्ष KEM च्या पाठीमागील एस पी कंपाऊंड या  झोपडपट्टीत श्री आनंदा साळुंखे ( चाफळ ) यांच्या लाकडी फळ्या आणि पत्र्याच्या आठ बाय दहाच्या खोलीत राहत होतो . गावाकडचे काही मित्र तिथे असल्यामुळे मी तिथं चांगलाच रमलो होतो . नरे पार्कच्या मैदानात रविवारी खुप क्रिकेट खेळायचो ! खोलीत जास्तच गर्दी झाली तर कधी KEM च्या पाठीमागील फुटपाथवर सुद्धा झोपायचो आम्ही मित्र ! खुप मजा वाटायची ! भेंडीबाजार येथे पोस्टींग असल्यामुळे तिथून जवळ पडायचं . परेल ते सँडहर्स्ट रोड असा नियमीत रेल्वे प्रवास असायचा . आनंद आणि त्याचा लहान भाऊ रवी ( आज या जगात नाही ) हे जिवाभावाचे झाले होते . रामघळी जवळील भैरेवाडीचे श्री विठ्ठल टोळे बाजुलाच रहात होते . त्यांच्याकडे खानावळीत जेवायचो . टोळे मावशी आईच्या मायेनं आम्हाला जेवण द्यायच्या ! मावशी आणि आबा ! देवमाणसंच !
     परेल स्टेशनवर नेहमीच खुप गर्दी ! सुरुवातीला मला रेल्वे प्रवासाची भितीच वाटायची . पण हळूहळू सरावलो गेलो ! नंतर लग्न झाल्यावर परेललाच पश्चिमेला खोली भाड्याने घेवून राहीलो . त्या नंतर एक वर्ष काळाचौकी या परेल लगत असलेल्या भागात राहीलो . नंतर मात्र ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात १८० स्क्वेअर फुटाची स्वतःची खोली घेतली . मुलुंडला बदली झाली .  संसार प्रपंच वाढू लागला तसे हळूहळू परेलचे दिवस भूतकाळात विरून गेले . जवळ बदलुन आल्यावर रेल्वेचा प्रवास सुद्धा संपला . कारण राहत्या ठिकाणा पासुन नोकरीचं ठिकाण हाकेच्या अंतरावर होतं . मुलं मोठी होत होती . शाळेत जायला लागली होती . पहिली खोली विकून जवळच थोडी मोठी खोली घेतली . आणि विक्रोळीला बदली झाली . हा सुद्धा प्रवास बसचा असल्यामुळे कधीतरी काही कामानिमीत्त रेल्वेचा प्रवास व्हायचा . अग्निशमन दलाची नोकरी .. त्यामुळे मुंबईचं धक्काधक्कीचं जिवन चांगलच परिचीत झालं होतं . कधी अपघातात , आगीत , पुरात , समुद्रात , बाँबस्फोटात , झाडं पडून , इमारती पडून , डोंगर कोसळून माणसं किडा मुंगीसारखी मरतात इथं .. आणि हे अंगवळणी पडलंय ! कारण अशा दुर्घटनांचा मुकाबला आम्हाला नित्य करावा लागतोय . जळालेल्या बॉड्या , कुजलेल्या बॉड्या , फासावर लटकलेल्या बॉड्या , पाण्यात बुडालेल्या बॉड्या , मातीच्या ढिगा-याखाली गाढल्या गेलेल्या बॉड्या , पडलेल्या इमारतीच्या ढिगा-याखालच्या छिन्न विछीन्न बॉड्या ! डेड बॉड्या आणि आमचं एकप्रकारे नातंच झालेलं !
     परवाच २५ तारखेला परेलच्या शिरोडकर हॉलला एका कार्यक्रमा निमीत्त गेलो होतो . परेल स्टेशनवर उतरलो तर .. प्लॅटफॉर्मवरून बाहेर जाण्यासाठी असलेल्या एकुलत्या ब्रिजवर प्रवाशांची तोबा गर्दी ! मी ५/७ मिनिटे तिथे प्लॅटफॉर्मवर उभा राहीलो . कारण गर्दी बघूनच धडकी भरत होती . खाली आणि वर दोन दोन पोलीस गर्दीला आवरण्याचा केवीलवाना प्रयत्न करत होते . तोच ब्रिज पश्चिम रेल्वेच्या एल्फींन्स्टन स्टेशनला जोडलेला असल्यामुळे मध्य रेल्वेचे चर्चगेटच्या दिशेला जाणारे प्रवासी दादर किंवा परेलला उतरतात . आणि एल्फींन्स्टन वरून दुसरी ट्रेन पकडून पुढे जातात . एक माऊली तिच्या १७/१८ वर्षाच्या मुलीला घेवुन KEM हॉस्पिटलला निघाली होती . त्या मुलीचे दोन्ही पाय कृत्रिम बसवलेले होते . मी एका तरुण प्रवाशाची मदत घेवुन त्या दोघींना पुढे करून मागुन गर्दीला आडवत ब्रिज चढून गेलो . खुपच कसरत करावी लागली आम्हाला . तेव्हाच डोक्यात विचार आला अशा गर्दीच्या वेळी जर ब्रिज कोसळला किंवा काही दुर्घटना झाली तर केवढा अनर्थ आेढवेल ! संध्याकाळी परत जाताना तर आणखी बिकट परिस्थिती !
    तिनच दिवसानी दिनांक २८ सप्टेंबर रोजी गावच्या संघटनेच्या कामानिमीत्त वरळीला धर्मादाय आयुक्तालयात जाण्यासाठी सकाळी ११ च्या दरम्यान परेलला उतरलो . ब्रिजवर चढण्यासाठी १० मिनिटे गर्दी कमी होण्याची वाट पाहून अखेर त्या गर्दीतूनच कसाबसा ब्रिज चढलो . माझ्या शर्टचे बटन तुटले होते त्या आेढातानीत . काही लोक आेरडत होते .. अरे करा ना आंदोलन .. काढा ना मोर्चा रेल्वे स्टेशन आॅफीसवर ! तिथली तोडफोड केल्याशिवाय रेल्वे प्रशासन जागं होणार नाही ! ६/७ फुटाचा अरुंद एकच ब्रिज .. आणि प्रवाशांची तुमान गर्दी ! हा कालचा दिवस ! या प्रश्नावर फेसबुकवर लिहीण्याचा मी निश्चय केला . कारण तिथं मोठी दुर्घटना होण्याचा संभव स्पष्ट दिसत होता . पण घरी आल्यावर दुसरेच काम लागल्यामुळे लिहायचं राहून गेलं . पण वेळ मिळेल तेव्हा लिहायचंच असा निश्चय मात्र पक्का केला .
     दिनांक २९ सप्टेंबर ! आज दुपारपाळी असल्यामुळे जेवन करत असताना सवयीप्रमाणे TV सुरू करून बातम्या लावल्या ! आणि TV वरील बातमी एेकून स्तब्ध झालो . त्याच ब्रिजवर एल्फींन्स्टनच्या बाजुला बाहेर पडण्याच्या ब्रिजवर प्रवाशांची चेंगराचेंगरी होवुन अनेक प्रवाशी जखमी आणि मृत झाल्याची बातमी येत होती . सुरुवातीला तिन नंतर एकोणीस .. थोड्या वेळाने बावीस मृत अशी बातमी येऊ लागली . भयानक फोटो आणि व्हिडिओ दाखवले जात होते ! watsap वर सगळे तेच मेसेज आणि फोटो व किंकाळ्यांचे व्हिडिओ ! मन सुन्न झालं होतं ! अखेर ते घडलंच होतं ! कितीतरी बळी गेले होते . कित्येक कायमचे जायबंदी झाले होते . कालच मनात वाटलेली भिती आज लगेचच खरी ठरली होती . पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं ... महाग असलेलं जगणं जगण्यासाठी कष्ट करणा-या माणसाला मरण किती स्वस्त झालं होतं !
     आता युद्धपातळीवर त्या ब्रिजचं काम केलं जाईल . एेसपैस सरकते जिने सुद्धा बसवले जातील ! एका दुर्घटनेत केवढी ताकद असते .. २०/२५ वर्ष रेंगाळत पडलेलं काम युद्धपातळीवर करायला भाग पाडते दुर्घटना ! उद्या मोठे ब्रिज बांधले जातील .. त्यात भ्रष्टाचार होवुन ते ब्रिज सुद्धा कोसळतील . अनेक माणसं किडामुंगीसारखी मरून आणखी सुख सुविधा येतील ! कशाला ????? माणसं मारायला .. माणसं चिरडायला ! इथे मिळतो .. एकदम स्वस्तात मृत्यु ! ही आहे मुंबई .. या .. आणखी या ! ट्रेन च्या ट्रेन भरून या ! इथं जगणं महाग असलं तरी .. मृत्यु स्वस्तात मिळतो !
विनायक देशमुख

Post a Comment

0 Comments