पाचगणी
खबरदार,यापुढे आमच्या स्थानिकांच्या नादाला लागाल तर ... प्रशासनाने यापुढे गांधारीची भूमिका घेतली तर कायदा आम्हीच पाळायचा असा नियम आम्ही सहन करणार नाही.बास झालं,आता पाणी नाकापर्यंत पोहचलंय, यापुढे चुकीला माफी नाही!अशी भीमगर्जना करून मश्वर तालुका संघर्ष समितीने प्रशासनाला आणि समाजाला त्रास देणाऱ्याविरोधात पोलीस तक्रारीचाच वाट पाहणार का?असा प्रश्न उपस्थित केला.आजचा पाचगणी बंद 100 टक्के यशस्वी झाला.
पांचगणी शहरासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात मनगटशाही,माहितीच्या अधिकाराचा वापर करून धमकावून,आपल्या पक्षाच्या लेटर हेडचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्या,करोडो रुपयांच्या जमिनी जागा बंगले हडपणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पांचगणी शहरातील व्यापारी वर्गाने सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन संघर्ष समितीच्या हाकेला साथ दिली.तर गुरेघर ,भोसे,भिलार,तायघाट ,दांडेघर या गावानेही 100% बंद पाळला.
आज सकाळी १० वाजता पांचगणीसह परिसरातील भिलार, गुरेघर, भोसे, तायघाट, पांगारी, दांडेघर, गोडवली, राजपुरी, खिंगर, आंब्रळ ,मेंटगुताड या गावातील ग्रामस्थ व महिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जमा झाले या ठिकाणी आबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा पुढे विठ्ठल मंदिरापासून छ.शिवाजी चौक मार्गे बस स्थानकावर आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक सहभागी झाले होते. बस स्थानकाला वळसा घालून हा मोर्चा पुढे शिवाजी चौकात आला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले. आमच्या मागण्यांबाबत प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत येथे येत नाहीत तोपर्यंत आम्ही चौकातून हलणार नाही असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, सभापती रुपाली राजपुरे, माजी उपनगराध्यक्ष वसंतराव बिरामणे, शेखर कासुर्डे,अंकुश मालुसरे, नगरसेवक नारायण बिरामणे, विठ्ठल बगाडे, दिलावर बागवान ,किसनशेठ भिलारे, राजेंद्र भिलारे, अजित कासुर्डे, विजय भिलारे , विनोद कळंबे, प्रवीण भिलारे, भारत पुरोहित, तानाजी भिलारे, शेखर भिलारे, मेहुल पुरोहित यांचेसह पांचगणी व परिसरातील सर्व ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी दांडेघराच्या थाप्यासंदर्भात चालूं असलेली गुंडगिरी, वीज वितरण आणि महसुल विभागाची या प्रश्नासाठी दादागिरी करणाऱ्यांना होत असलेली मदत,यामुळे हा प्रश्न चिघळला आहे यातील दोषींवर कारवाई करावी, उताऱ्यावर घरपड नसतानाही येथे वीज कनेक्शन दिली जातेय, कोर्टाचा मनाई आदेश असतांनाही गुंडांकडून पाचगणीच्या गुहेचा ताबा मिळवण्यासाठी चालू असलेली संघटनेच्या धटिंगशाही, गुरेघरच्या जमिनीचा प्रश्न, सलीम मोघल यांच्या जागेबाबत दमदाटी या विषयावर तातडीने मार्ग काढावा सर्वसामान्य नागरीक व स्थानिकांना न्याय मिळावा ,माहितीच्या अधिकाराचा वापर करून ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रवृत्तींना उत आला आहे.असा सूर या जमावासमोर उपस्थितांनी आवळला.साईट वर जाऊन फोटो काढायचे,बांधकाम पाडायला लावतो अशी भीती दाखवायची आणि मग दमदाटी करून पैसे उकळण्याचा धंदा या तालुक्यात फोपावला आहे. यावर स्थानिकांना न्याय मिळावा अशी मागणी बाळासाहेब भिलारे, शेखर कासुर्डे, राजेंद्रशेठ राजपुरे, अजित कासुर्डे, किसंनशेठ भिलारे, तानाजी भिलारे, मेहुल पुरोहित, आदींनी आपापल्या भाषणात केली.
संतप्त मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. गुरेघरपासून पांचगणी, दांडेघरपर्यंत सर्व बाजारपेठ बंद असल्याने पर्यटकाना या बंदचा फटका बसला.
१२ वाजता वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, महाबळेश्वरचे तहसीलदार रमेश शेंडगे,वीज वितरण कंपनीचे उपअभियंता नितीन पवार हे घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी पोलीस प्रशासनाने चर्चा केली.यावेळी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने पीडित लोकांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले,थाप्यावर कसलेही घर नसताना घरपड लागली कशी लावली जाते?घरपडीच्या कागदाची ढाल करून वीज वितरणही वीज द्यायला तयार होतंय हा कसला न्याय? यावर तहसीलदार शेंडगे यांनी याबाबत वीज वितरण कंपनीने आमचेकडे खुलासा मागितला असून चौकशी करून आम्ही उताऱ्यावरील घरपड काढून दोषींवर कारवाई करू असे सांगितले.
तर माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून ब्लॅकमेलिंग करणे, दादागिरी करून जागा व बंगले ताब्यात घेणे अशा भानगडी करणाऱ्या लोकांच्या तक्रारीं पोलिस ठाण्यात देण्यासाठी पुढे आल्यास त्यांचेवर कारवाई करणे सोपे जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अजित टिके व पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी सांगितले.
यावर प्रशासन आणि समाजाला माहिती अधिकाराच्या माध्यमातून वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींचा हेतू प्रशासनाला माहिती असूनही प्रशासन पीडितांकडून तक्रार करण्याची वाट पाहत असेल तर हे चक्र कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला.





0 Comments