सातारा
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सातार्यात दोन्ही राजांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यातील आरोपींपैकी कुणालाही सोडणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
येथील तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातील शिवतेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, सातारा हे शांतताप्रिय शहर आहे. अशा शहरात कोजागिरीच्या रात्री झालेला प्रकार अशोभनीय आहे. मात्र आमच्या पोलीस दलाने हा प्रश्न अतिशय परिणामकारक आणि नियोजनबद्ध पद्धतीने हाताळला. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांना अटकाव करण्यास आम्ही कुठेही कमी पडलो नाही. मात्र तरीही ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांची गय केली जाणार नाही. आत्तापर्यंत 13 जणांना याप्रकरणी अटक केल्याचे सांगून याठिकाणी झालेल्या गोळीबारातील दोन पुंगळ्या मिळाल्या असून त्या कोणत्या पिस्तुलातून झाडल्या गेल्या याचा तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फूटेज, कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन याचा परिपूर्ण तपास करुन यातील प्रत्येकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करत नांगरे पाटील यांनी या घटनेत बाहेरील काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही सामील असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगितले. ही केस जास्तीत जास्त काँक्रिट करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या प्रकरणात खासदार आणि आमदार ही वजनदार नेतेमंडळी असल्याने कारवाईबाबत तुमच्यावर प्रेशर होते का? या प्रश्नाला बगल देत त्यांनी याचवेळी विचारलेल्या दुसर्या एका प्रश्नाचे उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल दिली.
राजे समर्थकांच्या राड्यात आमचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी जीवाची पर्वा न करता जो बेडरपणा दाखवला त्यांच्या या कार्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून त्यांना रिवॉर्ड देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
खासदार-आमदार समर्थकांच्या राड्यानंतर आपण सातार्याला भेट दिलेली नाही याप्रश्नावर मी वेळोवेळी या घटनेचे रिपोर्टींग घेत होतो व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कायम संपर्कात होतो, असेही त्यांनी सांगितले. पोलीस अधिकार्याला धक्काबुक्की करणार्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे घटनास्थळी जातीने हजर होते. आणि त्यांनी हे प्रकरण अतिशय संयमाने आणि हुशारीने हाताळल्याचेही नमूद केले.
दरम्यान, प्रारंभी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईचा तपशील सांगताना नांगरे पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सावकारीप्रकरणी मोक्का लावलेल्या गँग, मटका, जुगार घेणारे बुकी, तडीपार गुंडाची यादीच वाचून दाखवली.
दरम्यान, सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या दिवशी सुमारे 1 हजार पोलीस विनामोबदला कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर एखाद्या गावात लोकांचा मोठा सहभाग होत असताना त्याचा जर फायदा होत असेल तर अशा ठिकाणी बंदोबस्त देणे हे पोलिसांचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळू, अजिंक्यवर होणार तडीपारीची कारवाई
या प्रकरणात असलेल्या नगरसेवक बाळू खंदारे व अजिंक्य मोहिते यांच्या तडीपारीचे प्रस्ताव आले असून त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.

0 Comments