Hot Posts

6/recent/ticker-posts

उदयनराजे यांच्यासह 150 जणांवर गुन्हा


टोल नाक्‍याचे व्यवस्थापन हस्तांतरण करण्यावरून झालेल्या राड्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आनेवाडी टोलनाक्‍यावर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी खासदार उदयनराजे, अशोक सावंत, अजिंक्‍य मोहिते, मुरलीधर भोसले, गुन्या सदाशिव आवळे, राजू गोडसे, सनी भोसले यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत हवालदार धनाजी कदम यांनी फिर्याद दिली आहे. कोजागरीच्या रात्री सुरूची बंगल्यासमोर झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी खासदार व आमदार समर्थकांवर खुनाचा प्रयत्न व "आर्म ऍक्‍ट'नुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या फिर्यादीवरूनही खुनाच्या प्रयत्नाचा व शासकीय कामात अडथळा आणून शासकीय अधिकाऱ्यास दुखापत केल्याचाही गुन्हा दाखल आहे. धुमश्‍चक्रीप्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा अटक केलेल्या शेखर चिकणे, चेतन सोळंकी, प्रतीक शिंदे, नितीन सोडमिसे या चौघांची पोलिस कोठडीची मुदत आज संपली. त्यांच्यासह काल अटक केलेल्या केदार राजेशिर्के याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. पहिल्या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत न्यायालयाने एक दिवसाने वाढविली. तर, केदारला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Post a Comment

0 Comments