कळंबी ता. खटाव येथील गाव ओढ्यालगत गेल्या 87 वर्षांपासून असलेला रस्ता गंगुबाई राजाराम घाडगे व राजाराम सिधू घाडगे यांनी अनाधिकाराने मुजविला असून त्यामुळे शेतकरी व रहिवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. याबाबत मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून याप्रकरणी सविस्तर चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मौजे कळंबी येथे सन 1930 पासून अस्तित्वात असलेल्या 33 फूटी रस्त्याची शासकीय रेकॉर्डवर रितसर नोंदही आहे. मात्र या रस्त्यालगतची जमीन (गट नं. 371 व सर्व्हे नं. 82) खरेदी केलेल्या गंगुबाई व राजाराम घाडगे यांनी अनाधिकाराने ओढ्यालगत असलेला 33 फुटाचा पूर्वापार चालत आलेला रस्ता मुजवून त्यावर अतिक्रमण केले आहे. दरम्यान, हा रस्ता मुजवू नये म्हणून, गावातील जगन्नाथ दगडू घाडगे यांनी कोर्टात धाव घेतल्यावर न्यायालयाने स्थगितीचा आदेशही दिला होता. याशिवाय गावातील वसंत वामन घाडगे व इतर 26 ग्रामस्थांनीही शासन दरबारी तक्रार केली होती. त्यानुसार तहसिलदार प्रियांका पवार यांनी मंडल अधिकारी श्री. राऊत, गावकामगार तलाठी आदी शासकीय कर्मचारी व जबाबदार ग्रामस्थांसमवेत घटनास्थळी जाऊन पंचनामाही केला होता. त्यानुसारर दि. 6 जुलै 2017 रोजी तहसिलदार प्रियांका पवार यांनी एका आदेशान्वये रस्ता मुजविणार्यांनी पुन्हा स्वखर्चाने रस्ता पूर्ववत करुन द्यावा, असा निकाल दिला आहे. मात्र, साडेचार महिने उलटून गेले तरीही त्या निकालाची काहीच अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.
वास्तविक सदरहू रस्ता 1930 पासून वहिवाटीमध्ये असून 1972 च्या दुष्काळी स्थितीत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. त्यानंतर समाजकल्याण समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे सभापती मानसिंगराव माळवे यांच्या फंडातून सन 2015 मध्ये या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. याशिवाय तत्कालीन जि. प. सदस्या सौ. शोभनाताई गुदगे यांच्या निधीतूनही या रस्त्याच्या व त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम झाले आहे. त्यामुळे सदरहू ठिकाणी रस्ता व पुल अस्तित्वात होता हे आपोआपच सिद्ध होते. मात्र, या ओढ्यालगत रस्ताच नव्हता आणि नाही, असे म्हणणार्या गंगुबाई व राजाराम घाडगे यांचा खोटारडेपणाच सिद्ध होतो. संबंधितांनी हा मुख्य रस्ता मुजवून अतिक्रमण करतानाच ओढ्यातून सहा फुटांचा पर्यायी रस्ता काढून दिला. मात्र, तो वाहून गेल्याने त्याचा सार्वजनिक स्वरुपात काहीच उपयोग झाला नाही व ग्रामस्थांची त्रेधातिरपीट सुरुच आहे. ‘आम्ही पर्यायी रस्ता तयार करुन दिला’ असा बनाव करीत ओढ्याच्या दक्षिणेकडील दुसरा पर्यायी रस्ताही संबंधितांनी अनाधिकाराने मुजवला आहे.
पर्यायी रस्ता नसल्याने गावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या पूर्व बाजुकडे सुमारे 400 एकर ऊसाचे क्षेत्र असून संबंधित शेतकर्यांचे रस्त्याअभावी मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सुमारे 87 वर्षांपासून वहिवाटीत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणार्या व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही संदीपदादांसह ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत दहा दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास 11 व्या दिवशी ‘मनसे स्टाईल’आंदोलन करण्यात येईल व त्याबाबतच्या होणार्या नुकसानीस शासनच जबाबदार असेल.
असा उल्लेख करुन जिल्हाधिकार्यांसह बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रतीही पुराव्यादाखल जोडल्या आहेत.
400 एकर ऊस क्षेत्र पडून
कळंबी गावातील ऊस उत्पादक शेतकर्यांसह रुग्ण, महिला, वृद्ध आणि विद्यार्थी यांची रस्तेअभावी मोठी गैरसोय होत असून शेतकर्यांचा 400 एकर ऊस वाहतुकीअभावी शेतात उभा आहे. तसेच रस्त्यापलिकडे मोठ्या प्रमाणावर असलेल्या निवासी वस्तीतील राहिवास्यांचेही आर्थिक, मानसिक व शारीरिक नुकसान होत आहे. दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
2 Comments
Satyasahyadri is Great I am proud of you, nothing like anything
ReplyDeletetx
Delete