सातारा
जकातवाडी येथील विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालयाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन शुक्रवारी दि. 20 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6. 30 वा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व पुस्तकप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पार्टे यांनी केले आहे.
जकातवाडी येथे 25 वर्षापूर्वी केवळ 100 पुस्तकांवर सुरू झालेल्या विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालयाने एक मोठा टप्पा पार केला आहे. शहराजवळील लोकांनाही वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेने सुरू केलेल्या या वाचनालयाने गेल्या 25 वर्षात अनेकांना समृद्ध केले आहे. विविध उपक्रम राबविण्याचे काम गेल्या 25 वर्षात झाले आहे. अरुणा ढेरे, इंद्रजित भालेराव, डॉ. उमेश कणकवलीकर अशा अनेक नामवंत लेखक, कवी यांनी वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थिती लावली आहे. सध्या वाचनालयात 12 हजारांहून अधिक पुस्तके असून वाचनालयाची स्वतंत्र इमारत आहे. त्याबरोबरच कवी संमेलन, कथाकथन स्पर्धा, प्राथमिक शिक्षकांसाठी विविध स्पर्धा, किल्ला स्पर्धा, महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार असून सातारा जिल्हा ग्रंथ भारतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक व लेखक डॉ. राजेंद्र माने, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विष्णू साळुंखे, दैनिक लोकमतचे सातारा आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे, पुढारीचे सातारा आवृत्ती वृत्तसंपादक हरीष पाटणे, दिनमान चॅनेल आणि दूरदर्शनचे प्रतिनिधी निवास डोंगरे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गुणवान विद्यार्थी आणि किल्ला स्पर्धेतील विजेत्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्यावर्धिनी वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments