कोरेगाव
भाजप-शिवसेना युतीचे सरकार केंद्रात आणि राज्यात असून, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे बळीराजाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कर्जमाफीच्या निव्वळ वल्गना केल्या असून, प्रत्यक्षात आजअखेर एकाही शेतकर्याची कर्जमाफी झालेली नाही. बळीराजाला बोगस म्हणणार्या या बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आली आहे, अशी प्रखर टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भाजप सरकारच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी मार्केटयार्ड ते तहसील कार्यालय असा शेतकरी संताप मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत आ. शिंदे यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. तीन वर्षात सरकारने केवळ सामान्य जनता आणि शेतकर्यांची दिशाभूल केली असून, एकही आश्वासन पाळलेले नाही. केवळ अच्छे दिन म्हणून गप्पा मारणार्या सरकारला आणि भाईओ-बहनो असे म्हणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षात शेतकर्यांच्या प्रश्नांवर प्रचंड आंदोलने होऊन देखील सरकारने ठोस पावले उचललेले नाही. राज्यात 15 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून, सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य अशी बदनामी महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे, त्याची फिकीर देखील या नाकर्त्या सरकारला राहिलेली नाही, असा आरोप करुन आ. शिंदे पुढे म्हणाले की, सुरुवातीला तर सरकारने शेतकर्यांना कर्जमाफी देण्यास नकार दिला होता. सर्वच विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आणि शेतकर्यांनी संपाचा इशारा दिल्यानंतर घाईघाईत कर्ज माफी जाहीर केली व त्याचे ढोल बडवले, प्रत्यक्षात त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. सरकारची नियत साफ नसल्यामुळे कर्जमाफी लवकर होणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात एकूण 89 लाख शेतकर्यांपैकी केवळ पन्नास टक्के शेतकर्यांचे ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज भरले गेले आहेत, त्यापैकी 10 ते 15 लाख शेतकरी बोगस आहेत, असे अपमानास्पद उदगार भाजपच्या मंत्र्यांनी काढून, बळीराजाचा अपमान केला आहे. केवळ नुसत्या घोषणा करुन जनतेची दिशाभूल करणार्या बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आली आहे. नोटबंदी, जीएसटी आदी निर्णय देशावर दुरगामी परिणाम ठरविणारे असून, ते अट्टाहासापोटी घेतलेले आहेत. देश आर्थिक मंदीत गेला असून, बेरोजगारी वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅसचे दर वाढवून सामान्यांना जोरदार धक्का या सरकारने दिला असून, महागाई नियंत्रणाखाली आणण्यास सरकारला सपशेल अपयश आले असल्याचा आरोप आ. शिंदे यांनी केला.
मार्केटयार्ड येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडी होती. मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. सातारा जकात नाका, आझाद चौक, हनुमान मंदिर चौक, स्व. आमदार दत्ताजीराव बर्गे चौकात जोरदार घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या बाहेर पार्किंग परिसरात सार्थक महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई शिंदे यांच्यासह सौ. सुरेखा पाटील, श्रीमती प्रतिभा बर्गे व महिला पदाधिकार्यांनी चूल मांडून, त्यावर स्वयंपाक करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला.
आ. शशिकांत शिंदे, सौ. वैशालीताई शिंदे, युवा नेते तेजस शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कार्याध्यक्ष श्रीमंतदादा झांजुर्णे, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले-निकम, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र भोसले, बाळासाहेब फाळके, श्रीमंतभाऊ झांजुर्णे, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक संजय पिसाळ, किशोर बर्गे, डॉ. गणेश होळ, संतोष चिनके, नगरसेविका सौ. मंदा बर्गे, सौ. संगीता बर्गे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार सौ. स्मिता पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सरकारच्या चुकीच्या भूमिकेच्या विरोधात आ. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

0 Comments