Hot Posts

6/recent/ticker-posts

वाठार निंबाळकर येथील कदम यांच्या घरी घातक कीटकनाशक आढळली, सत्य सह्याद्री चे वृत्त तंतोतंत


घटनास्थळी आढळलेली कीटकनाशकाची पाकिटे
विक्रम चोरमले(फलटण):-
वाठार निंबाळकर ता. फलटण येथील शिवानी संतोष कदम (वय ११) महिने व शिवाजी संतोष कदम (वय ४ वर्ष) या दोन्ही मुलांचा मृत्यू नंतर संतोष वामन कदम (वय ४०) व पूजा संतोष कदम (वय ३५) या पती-पत्नीची प्रकृती खालावली होती. लहान दोन मुलाचा मृत्यु कोणत्या आजाराने झाला तसेच कदम पती-पत्नीना कोणता आजार झाला यांचे ठोस निदान होत नव्हते. दैनिक सत्य सहयाद्रीने गेली २ दिवस या घटनेची खोलवर पुराव्यानिशी माहिती घेतली २ दिवसाच्या घडामोडीत संतोष वामन कदम यांनी काही दिवसांपूर्वी धान्यास कीड लागू नये म्हणून अंत्यत विषारी घटक असलेले कीटकनाशक सुकलेल्या मका दाण्यास कीड लागू नये म्हणून वापरली असल्याची खात्रीशीर बातमी वृत्तपत्राद्वारे दिली.


दैनिक सत्य सह्याद्रीने शासकीय यंत्रणेला केले अवगत


दैनिक सत्य सह्यादीने गांभीर्य ओळखत फक्त बातमी घेणे व ती प्रसिद्ध करणे हे काम न करता या संपूर्ण घटनेबाबत विविध शासकीय यंत्रणेला याबाबत अवगत करण्याची जबाबदारी स्वीकारली. बातमीचे संकलन न करता रात्री उशिरापर्यंत संतोष जाधव उपविभागीय अधिकारी फलटण, गोरखनाथ डोईफोडे तालुका कृषी अधिकारी, कैलाश थोरात कृषी सहायक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे तपासी कर्मचारी, संतोष नाबर तलाठी, महादेव अढाव ग्रामसेवक या अधिकारी व कर्मचारी यांना फलटण वार्ताहर यांनी फोन वरून सविस्तर बाब निदर्शनास आणून दिली. संतोष वामन कदम हे राहत असलेल्या वाठार निंबाळकर ता. फलटण येथे घरी भेट देऊन तपासणी केल्यास या घटनेबाबत काही बाबी समोर येतील तसेच तज्ञ डॉक्टरांनी केलेल्या निदाना बाबतही अवगत केले. सर्व संबंधित शासकीय विभाग दिनांक २२ च्या संध्याकाळ अखेर कदम कुटूंब डेंग्यूमुळे आजारी असल्याचे समजत होती. परंतु दैनिक सत्य सह्याद्रीने सर्व मेडिकल रिपोर्ट बद्दल माहिती दिली. संतोष वामन कदम (वय ४०) व पूजा संतोष कदम (वय ३५) या पती-पत्नीच्या डेंग्यू टेस्ट निगेटिव्ह आहेत यांची कल्पना दिली. यानंतर फलटण वाठार निंबाळकर येथील दोन्ही मुलाचा मृत्यू प्रकरणी घटनास्थळाची उपविभागीय (प्रांत) अधिकारी,पोलीस, कृषी,  पंचायत समिती यांच्याकडून कुटुंब राहत असलेल्या घराची पहाणी व तपासणी करण्याबाबत एकमत झाले.


घटनास्थळी अंत्यत विषारी कीटकनाशके सापडली


कदम कुटुंब राहत असलेल्या वाठार निंबाळकर येथील गावातील राहत्या घरी काल दिनांक २३ रोजी सकाळी १०:३० वाजता संतोष जाधव उपविभागीय अधिकारी फलटण, प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषी अधिकारी,गोरखनाथ डोईफोडे तालुका कृषी अधिकारी, बी.एस. बोडरे कृषी अधिकारी पंचायत समिती फलटण, दिपक महागंडे विस्तार अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती फलटण,अशोक शेळके पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी भोसले व ईतर पोलीस कर्मचारी,संतोष नाबर तलाठी, महादेव अढाव ग्रामसेवक,के.के. राऊत कृषी पर्यवेक्षक, कैलाश थोरात कृषी सहायक, विनोद निबांळकर कृषी सहायक, यादव कृषी सहायक, करे कृषी सहायक यावेळी हजर होते. यावेळी कदम कुटुंबाच्या नातेवाईकानी दिनांक २२ रोजी घराच्या परिसरात सापडलेली मका दाण्यास वापरण्यात आलेली कीटकनाशकाची रिकामी ९ पाकीट वरील सर्व अधिकार यांना दाखवली व ज्या खोलीत ही मका दाण्यास कीटकनाशक लावून पोती ठेवली होती ती खोली दाखवली यानंतर पोलीस कर्मचारी यांचेमार्फत त्या खोलीचा पंचनामा करण्यात आला व कीटकनाशकाची रिकामी ९ पाकीट ताब्यात घेण्यात आली.
 
       
यानंतर कदम कुटुंबाच्या नातेवाईकानी कीटकनाशकाच्यामुळे ही घटना घडली असावी या शंकेने दिनांक २२ रोजी घरातील मका दाण्याची ९ पोती जवळच असलेल्या शेतातील घरी ठेवली होती. वरील सर्व अधिकारी यांनी नंतर शेतातील घरी भेट दिली. शेतातील घरी ९ मका दाना असलेली पोती आढळून आली यानंतर या घराचा पंचनामा करण्यात आला व ९ मका दाना असलेली पोत्याचे वेगवेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. नमुने घेतेवेळी पोलीस कर्मचारी यांना काळजी घेण्याची सूचना संबंधित अधिकारी यांनी दिली होती.


कीटकनाशकाची विक्री करणाऱ्या दुकानदाराची भूमिका संशयास्पद

 संतोष जाधव उपविभागीय अधिकारी फलटण यांनी प्रकाश सूर्यवंशी उपविभागीय कृषी अधिकारी,गोरखनाथ डोईफोडे तालुका कृषी अधिकारी,अशोक शेळके पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, कैलाश थोरात कृषी सहायक यांना संतोष वामन कदम यांनी व त्यांच्या नातेवाईक यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे फलटण मधील ज्या दुकानातून कीटकनाशकाची खरेदी करण्यात आली होती त्या प्रसिद्ध कृषी भंडार केंद्र यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकारी यांनी त्या दुकानात भेट दिली असता दुकानदाराने सदर कीटकनाशक विक्री केली नसल्याचे सांगितले. संबंधित दुकानाच्या विक्री बिलाची तपासणी केली असता विक्रीची नोंद आढळून आली नाही. परंतु दुसरीकडे संतोष वामन कदम यांनी व त्यांच्या नातेवाईक त्याचं दुकानातून कीटकनाशक खरेदी केली होती हीबाब नमूद केली.


कारवाईच्या भीतीने फलटण मधील अनेक कृषी विक्री दुकाने बंद


काल फलटण मधील प्रसिद्ध कृषी भंडार केंद्र तपासणी चालू आहे ही माहिती मिळताच फलटण मधील अनेक दुकाने कारवाईच्या भितीने बंद करण्यात आली. कृषी विभागाच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी दुकानदारांना दुकाने खुली ठेवावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही देण्यात आल्या.


घरगुती धान्यासाठी वापरण्यात न येणाऱ्या कीटकनाशकाची विक्री झाली

संतोष वामन कदम यांना जे कीटकनाशक मोठ्या धान्य गोदामात वापरली जातात. यांची विक्री घरगुती धान्यासाठी  शक्यतो वापरण्यात न येणाऱ्या कीटकनाशकाची विक्री करण्यात आली होती. विक्री करताना त्यांचा वापर कशाला व किती पोत्यासाठी करायचा आहे यांची माहिती विक्री करणाऱ्या दुकानदाराने कदम यांच्याकडून घेतली नव्हती तसेच ते कसे वापरले गेले पाहिजे यांची माहीतीही दिली नव्हती अशी बाब तपासात व कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्यातुन समोर येत आहे. तसेच कीटकनाशक विक्री करताना पक्की पावती न देता कच्ची पावती बहुतेक दिली गेली आहे. या विक्री पावतीच तपास सुरू आहे पावती मिळताच पुढील कारवाई करण्यात मदत मिळणार आहे.


चुकीच्या पध्दतीने कीटकनाशकाचा वापर झाला

घटनास्थळी कदम नातेवाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार जी कीटकनाशके खरेदी करण्यात आली त्यां कीटकनाशकाचा वापर जसा व्हायला हवा होता किंवा ज्या प्रमाणात व्हायला हवा होता तसा झाला नाही. जे कीटकनाशक फक्त पुडा खोलून ठेवायचे असते ते कीटकनाशक पावडर हाताने मका दाण्यास चोळले गेले. एका पोत्यास जे प्रमाण हवे त्यापेक्षा अधिक प्रमाणात ते मका दाण्यास लावण्यात आले. ज्या राहत्या खोलीत ही पोती ठेवण्यात आली होती. त्याचं खोलीत कदम कुटूंब झापले होते. दरवाज्या व खिडक्या बंद केल्याने पूर्ण रात्र शरीरावर या कीटकनाशकाचा वाईट परिणाम होऊ शकतो ही बाब संबंधित अधिकारी यांनी बोलून दाखवली.


कीटकनाशक विक्री करताना खबरदारी घेण्यात आली नाही

 कीटकनाशक औषधाची विक्री करताना त्यांचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे तसेच किती धान्यासाठी करण्यात येणार आहे, कीटकनाशक किती प्रमाणात व कसे वापरावे यांची माहिती दुकानदारांनी शेतकरी यांना देणे गरजेचे असताना विक्री करताना खबरदारी घेण्यात आली नाही.


संतोष कदम, पूजा कदम यांची प्रकृती स्थिर

संतोष वामन कदम व पूजा संतोष कदम या पती-पत्नीच्यावर कीटकनाशकाचा शरीरावर परिणाम होऊन व्हायरल इन्फेक्शन झाला असल्याची शक्यता गृहीत धरून ससून हॉस्पिटलमध्ये  दिनांक २२ पासून उपचार सुरू आहेत. काल रात्रीअखेर संतोष वामन कदम व पूजा संतोष कदम प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.


मुलांचा जीव वाचवता आला असता

शिवानी संतोष कदम (वय ११) महिने व शिवाजी संतोष कदम (वय ४ वर्ष) या दोन्ही लहान मुलांचा मृत्यू होण्यापूर्वी कीटकनाशकामुळेही ही घटना घडू शकते ही बाब समोर आली असती तर त्यापद्धतीने उपचार करण्यात आले असते व दोन्ही लहान मुलांचा मृत्यू टाळता आला असता. ज्यावेळी मुलांच्या शवविच्छेदन अहवालात एक गोष्ट समोर आली की या लहान मुलाच्या फुफुसास सूज होती, दुसरी बाब समोर आली की दोन्ही मुलाचे निधन कोणत्याही आजाराची लक्षणे नसतात अचानकपणे उलटी होऊन झाले होती यावेळी कीटकनाशकामुक मृत्यू झाला असण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखल्यामुळे या घटनेला वेगळी कलाटणी मिळाली.


कीटकनाशकाचा वापर योग्य रीतीने व काळजीपूर्वक तसेच तज्ञांच्या सल्याने करण्याच्या सूचना

घटनास्थळी संतोष जाधव उपविभागीय अधिकारी फलटण यांनी तातडीने महादेव अढाव ग्रामसेवक व तलाठी संतोष नाबर यांना गावामध्ये तसेच दिनांक २४ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांना कीटकनाशके योग्य रीतीने व काळजीपूर्वक तसेच तज्ञांच्या सल्याने वापर करण्याबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या. दिपक महागंडे विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती फलटण यांनी शेतकऱ्यांना तत्काळ कीटकनाशकांचा वापराबाबत शेतकऱ्याचे तत्काळ कार्यक्रम राबविण्यात येतील असे यावेळी सांगितले.


तहसील कार्यालयाचे या घटनेकडे दुर्लक्ष

वाठार निंबाळकर ता. फलटण येथील संतोष वामन कदम, पूजा संतोष कदम,शिवानी संतोष कदम (वय ११) महिने व शिवाजी संतोष कदम (वय ४ वर्ष) या कदम कुटुंबियाच्या बाबतीत मोठी दुर्घटना घडली होती. दोन्ही मुलांचा मृत्यू हा कीटकनाशकामुळे झालं असल्याचा संशय असताना. तसेच शेतकरी कदम पती-पत्नी यांची प्रकृती चिंताजनक असताना गेली तीन ते चार दिवस विजय पाटील तहसीलदार फलटण यांनी या कदम दाम्पत्याची अथवा घटनास्थळी भेट दिली नाही अथवा कोणताही संपर्क अथवा सूचना केल्या नाहीत. दैनिक सत्य सहयाद्रीच्या फलटण वार्ताहर यांनी दिनांक २३ रोजी या घडलेल्या घटनेबद्दल अवगत करण्यासाठी फोनही केला होता परंतु तहसीलदार फलटण यांनी फोन उचलला नाही अथवा परत फोन अथवा मेसेज ही केला ही नाही. आमच्या वार्ताहर यांनी स्वतः तहसील कार्यालयात जाऊन घटनेची कल्पना देऊनही काल सकाळी घटनास्थळी तहसीलदार विजय पाटील अथवा तहसील कार्यालयातील अन्य कोणतेच कर्मचारी तसेच वाठार निंबाळकरचे मंडल अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. घटनास्थळी ग्रामस्थ व कदम कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या अनुपस्थितिबाबत विचारणा करत होते. फलटण तालुक्यात मोठी दुर्घटना घडूनही तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकारी खुर्ची सोडायला तयार नव्हते. एकीकडे तालुक्यास्तरीय सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी काल या घटनास्थळी घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित रहायला हवे होते. प्रत्येक विभागाच्या स्तरांवर या बाबत जबाबदारीने काम करण्यात आले परंतु तहसील विभाग हा या घटनेपासून अलिप्त होता. गैरहजर अधिकारी सोशल मीडियावर या घटनेच्या बातम्या वाचण्यात तेवढे मग्न होते.

मुख्यमंत्री सहाय्यता  निधी अथवा ईतर योजनेमधून मदत करण्याची मागणी

कीटकनाशकामुळे संतोष वामन कदम, पूजा संतोष कदम,शिवानी संतोष कदम (वय ११) महिने व शिवाजी संतोष कदम (वय ४ वर्ष) या कदम कुटुंबियाच्या बाबतीत मोठी दुर्घटना घडली असून दोन लहान मुले मृत्यू पावली आहेत यांमुळे कदम कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्याता निधी अथवा ईतर योजनेतून मदत द्यावी अशी मागणी काल नातेवाईक व ग्रामस्थ यांनी संतोष जाधव उपविभागीय अधिकारी फलटण व घटनास्थळी उपस्थित अधिकारी यांना केली.


आता येणाऱ्या काळात या घटनेबाबत अनेक गोष्टींचा तपास होण्याची गरज असून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत व या घडलेल्या दुर्घटनेला वाचा फोडण्यासाठी दैनिक सत्य सह्याद्री जबाबदारीने प्रयत्न करणार असून अशी घटना पुन्हा घडू नये हाच आमचा प्रयत्न असणार आहे. अनेक वाचकांनी आमच्या दैनिकाशी संपर्क करून आमचे प्रोत्साहन वाढवले आहे. आम्ही यापुढे आमची जबाबदारी पार पाडू. 


राहत्या घराचा फोटो


सूचना देताना अधिकारी

Post a Comment

0 Comments