सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
शेतातील सागाच्या झाडांची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी मौजे निनाम ता. सातारा येथील तलाठ्याला 10 हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. अमोल अमरदीप पाटील (वय 29) सध्या रा. दौलतनगर सातारा मूळ रा. काटोडा ता. चिखली जि. बुलढाणा, असे त्या तलाठ्याचे नाव आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदाराच्या शेतजमीनीमध्ये सागाच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. या झाडांची नोंद करून सातबारा उतारा त्यांना हवा होता. या कामासाठी मौजे निनामचे तलाठी अमोल पाटील यांनी 15 हजार रूपयांची लाच मागितली होती. परंतु तडजोडी अंती 12 हजार रूपये देण्याचे ठरले होते पैकी त्यातील 10 हजार रूपयांची रक्कम शुक्रवारी सातारा तहसील कार्यालयासमोरील हाटेल शिवसागर येथे स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बयाजी कुरके, आनंदराव सपकाळ, संभाजी बनसोडे, भरत शिंदे, विजय काटवटे, शंभु सपकाळ, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसुळ, विनोद राजे, अजित कर्णे, संभाजी काटकर, प्रशांत ताटे, विशाल खरात, श्रीमती जमदाडे, मधुमती कुंभार, श्रध्दा माने यांनी केली.

0 Comments