डिकसळ
डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी मोठा संघर्ष करुन डिकसळ, ता. कर्जत, जि. रायगड येथे रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची उभारणी करुन याठिकाणी शोषित, वंचित तसेच रायगड जिल्ह्यामध्ये असणार्या आदिवासी समाज यांची नि:शुल्क वैद्यकीय सेवा करुन समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. तासगावकरांचे रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर अल्पावधीतच नावलौकिक मिळवेल. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण उभी राहिली तर त्यांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक दीपकभाऊ निकाळजे यांनी रायगड हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमधील डायलिसीस विभागाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी डिकसल, ता. कर्जत, जि. रायगड येथे रायगड हॉस्पिटल व रिसर्च सेंटर हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले असून या भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आजकालच्या वैद्यकीय सुविधा सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नाहीत. परंतू समाजामध्ये अनेक लोकांच्या शर्टाला खिसेच नसल्यामुळे अशा शोषित वंचित लोकांची वैद्यकीय सेवा करण्याचा वसा डॉ. तासगावकर यांनी घेतलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून डॉ. तासगावकर या भागामध्ये नि:शुल्क वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत. भविष्यामध्ये कोणतीही मोठी अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या पाठिमागे मी ठामपणे उभा राहणार आहे. त्यामुळे डॉ. तासगावकरांनी कोणाचीही भिडभाड न ठेवता आपले रुग्णसेवेचे काम सुरु ठेवावे, असे प्रतिपादन दीपकभाऊ निकाळजे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. तासगावकर म्हणाले, दीपकभाऊ निकाळजे यांनी रिपाइं पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक काम केले आहे. दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये युवकांची मोठे संघटन दीपकभाऊंच्या पाठिशी उभे आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून दीपकभाऊंकडे पाहिले जाते. आज त्यांचा आशिर्वाद मला लाभलेला आहे. हे मी माझे भाग्य समजतो. आज दीपकभाऊंनी रायगड हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमधील डायलिसीस सेंटरचे उद्घाटन केले. त्यामुळे आम्हाला इथून पुढे आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. भविष्यामध्येही दीपकभाऊंचा पाठिंबा आम्हाला राहील. त्यामुळे रायगड हॉस्पिटल व रिसर्च सेंटर जगभरामध्ये लौकिक पावेल, याची मी ग्वाही देतो.
दरम्यान, चांदई, ता. कर्जत, जि. रायगड येथील यादवराव तासगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या मुंबई विद्यापीठातील सर्वात मोठ्या कॉलेज कॅम्पसला दीपकभाऊ निकाळजे यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी केले. तर पत्रकार संग्राम निकाळजे यांचे स्वागत राजेश तासगावकर यांनी केले. या कार्यक्रमास महेश काशिद, रमाकांत करे, जाकीर पठाण, बाहुबली शिरोटे, प्रिंसिपल डॉ. सईद, मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. अरुण मोप्रीकर, असो. डीन डॉ. विकास कांबळे, सतीश चव्हाण, वैद्यकीय अधिकार्यांसह, हॉस्पिटलचा स्टाफ व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments