Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण-बारामती रस्त्यावरील लोखंडी संरक्षण कठडे गायब, अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद


फलटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
फलटण-बारामती रस्त्यावरील सांगवी गावानजीक अपुऱ्या पुलावरील एका बाजूकडील लोखंडी संरक्षण कठडे बसवण्यात आले नाहीत. या रस्त्यावरून वाहतूक करणारी वाहने कठडे नसल्याने कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता असून लोखंडी संरक्षक कठडे त्वरीत बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सांगवी येथील पूल पुरामुळे वाहून गेला होता व त्यामुळे बारामती-फलटण वाहतूक काही काळ बंद करावी लागली होती यानंतर महामार्गाच्या कामातील अर्धवट अवस्थेतील पूल दुरुस्त करून त्यावरून ही वाहतूक सुरू करण्यात आली होती. या पुलाचा विचार करता संरक्षणात्मकदृष्ट्या दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक कठडे न बसवता फक्त एकाच बाजूला लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत. या लोखंडी संरक्षण कठडे बसवताना अर्धवटच कठडे कसे बसवण्यात आले? या महामार्गाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही का? एका बाजूला लोखंडी संरक्षण कठडे न बसवता संपूर्ण कामाचे पैसे अदा करण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीत या महामार्गाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. आजघडीला येथील एका बाजूला लोखंडी संरक्षक कठडे नसल्याने संरक्षणकठड्या अभावी अपघात घडण्याची शक्यता असून या रस्त्यावरून वाहतूक मोठया प्रमाणात होत असून लोखंडी संरक्षक कठडे नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

संरक्षण कठड्याचा अभाव म्हणजे जणू अपघातालाच निमंत्रण असल्याने या गंभीर व जीवघेण्या परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग बारामती या कार्यालयातील अधिकार्‍यांच्या कामकाजाची चौकशी करावी व गांभीर्याने लक्ष देवून सदर अतिमहत्वाच्या पुलाची तातडीने पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी करत आहेत. एका बाजूला लोखंडी कठडे तत्काळ बसवावेत. या रस्त्यावर एस.टी. बसेस, ऊस वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, मिनीडोअर, रिक्षा, स्कूल बस, लक्झरी बसेस, मोटारसायकल, अवजड व ओव्हरलोड वाहनांसह इतर अनेक प्रकारच्या वाहनांची वाहतूक सातत्याने व मोठ्या प्रमाणावर होत असते.

जीवघेणे अपघात हे सांगून होत नसतात. तर ते केव्हाही कधीही होत असतात. त्यामुळे संरक्षणात्मकदृष्ट्या पूर्वकाळजी घेत रस्त्यांची डागडुजी देखभाल व दुरुस्तीकडे संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत संरक्षण कठड्याअभावी अपघाती धोक्याची घंटा वाजत असल्याने कोणत्याही दुर्घटनेची प्रतिक्षा न करता संबंधीत शासन- प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी तातडीने संरक्षण कठडे बसवावेत अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. तसेच नव्याने ज्या ठिकाणी संरक्षण कठड्यांची नितांत गरज आहे त्या सर्व ठिकाणी लोखंडी व सिमेंटचे मजबुत कठडे बसविण्यात यावेत व प्रवाशांचा प्रवास सुरक्षित तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी आग्रही मागणी वाहनचालक, प्रवासी जनतेतून व ग्रामस्थांनमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Post a Comment

0 Comments