पुणे येथील भिमथडी यात्रेत फेडरेशनच्या स्टॉलला श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी स्टॉलवर उपस्थित महिला
सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
पुणे येथील सिंचननगर येथे कृषी महाविद्यालयाच्या मैदानात बारामती अ्रग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने भरवण्यात आलेल्या भिमथडी यात्रा या प्रदर्शनात राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या स्टॉलवर सातार्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. या प्रदर्शनात सातार्याच्या स्टॉलवर 27 प्रकारच्या विविध वस्तू आणि माल विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. दि. 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत चाललेल्या या प्रदर्शनात सातार्याच्या स्टॉलवर 21 हजार 303 वस्तूंची विक्री झाली आणि सातार्यातील विविध बचत गटांतील महिलांना त्याचा चांगलाच लाभ झाला.
राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनमार्फत बचत गटांचा उत्पादित माल देशातील विविध शहरातील हजारो ग्राहकांपर्यत पोहचवण्याचा निर्धार फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी नुकताच जाहिर केला होता. त्यानुसार पुणे येथे झालेल्या भिमथडी यात्रेत सौ. वेदांतिकाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सातार्यातील महिला बचत गटांच्या वस्तू आणि माल विक्रीसाठी फेडरेशनमार्फत स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर सेंद्रीय गुळ, चिकू, आवळा, छोटी टोपली, खुराडी, परडी, उभा ग्लास, बाजरी पिठ, इंद्रायणी तांदूळ, घेवडा डाळ, तांदूळ पिठ, झेंडू माळ, विविध प्रकारचे सेंट आदी 27 वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाचे उदघाटन अ्रग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या संस्थापिका सौ. सुनंदाताई पवार, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, पोलीस अधिकारी ज्योती प्रिया सिंग, सुनंदा सपकाळ, स्वाती साठे, सुमन किर्लोस्कर, वर्षा चोरडिया, फेडरेशनच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रदर्शनातील सातार्याच्या स्टॉलला या सर्व मान्यवरांनी भेट दिली आणि बचत गटांच्या उत्पादित मालासाठी फेडरेशनने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला प्रत्येक दिवशी लाखो लोकांनी भेट दिली. या प्रदर्शनात विविध खाद्य पदार्थ आणि वस्तूंच्या स्टॉल्सची रेलचेल पहायला मिळाली. सातार्यातील महिला बचत गटांसाठीच्या स्टॉलवर असंख्य ग्राहकांनी गर्दी करुन मनमुराद खरेदी केली. यामुळे फेडरेशनचा बचत गटाच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देश खर्या अर्थाने सफल झाला असून यापुढे देशभरातील प्रत्येक प्रदर्शनात सातार्यातील महिला बचत गटांची उत्पादने फेडरेशन पोहचवेल, असे सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

0 Comments