Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणमध्ये बिबट्याचा शोध सुरूच, सोशल मीडियावर अफवाचा भडिमार


फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
वन विभाग गेली तीन दिवस बिबट्याचा शोध घेत असून अद्यापही यात यश मिळाले नसून आजअखेर शोध मोहीम सुरू आहे. काल संपूर्ण दिवसभर सोशल मीडियावर अफवांचा भडिमार सुरू होता. जो तो बातमीची खात्री न करता पोस्ट करण्यात रमला होता. या अफवाच्या बातम्यांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात गोंधळाची परिस्तिथी निर्माण झाली होती. बिबट्याचा शोध घेणार वन विभाग व पोलीस विभाग अशा अफवामुळे पुरता वैतागला होता. चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांमुळे संबधित विभागाने अशा अफवा पसरवण्यात येणाऱ्या व्यक्तिवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली. बिबटया सापडला अशा सोशल मीडियावरील अफवामुळे नागरिक बिनधास्त होऊन एखादा अपघात घडू शकतो यांचे भान नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे व जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करणे गरजेच आहे. वन विभागाला बिबट्याला पकडण्यासाठी वेळ द्यायचा सोडून व अफवा दूर करण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे.

       फलटण शहरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची पक्की खात्री झाल्यानंतर संपूर्ण फलटण शहरच नव्हे तर तालुक्यात भितीचे वातावरण असून शालेय विद्यार्थी महिला वर्गात व शेतकरी यांच्यात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. स्वेटर घातलेले कुत्रे असावे,फलटणमध्ये कुठून येणार बिबट्या तरस असेल अशा अफवांचे पेव फुटले अनेक अधिकारी व नागरिक तसे बोलूनही दाखवत होते. त्यानंतर फलटण गजानन चौकातील सिनेमा गृहातील सी.सी.टीव्ही फुटेज सोशल मीडियावर झळकले बिबटयाचा वावर फलटणमध्ये आहे आणि बिबट्याचे बछडे असावे असे वन विभागाने स्पष्ट केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा येथील वन अधिकारी फलटण मध्ये दाखल झाले. एकीकडे वन विभागाचा तपास सुरू असतानाच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर दगडी पूल येथे बिबठ्याचा आवाज ऐकल्याचे काही स्थानिक महिलांनी सांगितल्याने पोलीस विभाग व वन अधिकारी यांच्याकडून त्याठिकाणी सुमारे दोन ते तीन तास चाललेली तपास मोहीम राबविण्यात आली परंतु इथेही अपयश आले.

         दरम्यान नगर पालिकेने जाहीर आवाहन करून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले .पहाटे येणारे पाणी उशिरा सोडले त्यामुळे महिला वर्गास दिलासा मिळाला. दरम्यान बिबट्या दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर येणारे अफवेचे मॅसेज हे अत्यंत चुकीचे व खोटे येत असून गिरवी नाक्यावर बिबट्या दिसल्याच्या,सराफाच्या विहिरीत बिबट्याला केले जेरबंद या क्लिप व फोटो पूर्णपणे खोट्या असून अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवु नये असे वन विभाग व पोलीस विभाग यांच्याकडून सांगण्यात येत आहे. गेली दोन दिवसापासून वन विभागाचे चार ते पाच पथक दिवसा तसेच खासकरून रात्री व पहाटे फलटण शहर व शहरालगत बिबट्याचा शोध घेत असून अद्यापही बिबटया आढळून आला नाही. अजूनही नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments