Hot Posts

6/recent/ticker-posts

अन् जिल्हाधिकारी झाल्या भावनिक, धरणबाधितांच्या पाठिशी बहीण म्हणून उभी राहणार असल्याचे अभिवचन


कुडाळ/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
धरणात जमीन गेली, काहींच पुनर्वसन झालं, काहींच होईलही. पण, कित्येक समस्या आजही कायम आहेत. आमच्या कुटुंबातील एक घटक म्हणून तुम्ही त्या समस्या जाणून घ्या आणि सोडवा, अशी गावकर्‍यांनी घातलेली साद ऐकून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल अक्षरश: भावनिक झाल्या. ‘मुळात मला धरण बाधितांच्या व्यथा प्रत्यक्ष समजून घेवून सोडवायच्या आहेत, त्यामुळे मी अशा प्रत्येक गावात जात आहे.हा प्रश्‍न जिल्हाधिकारी म्हणून तर सोडायचा आहेच पण तुमची बहीण म्हणूनही तुमच्या या प्रलंबित प्रश्‍नातून मार्ग काढून तुमचं जीवन आनंदीत झालेलं बघायचं आहे.’, अशा श ब्दांत त्यांनी धरणबाधितांना धीर दिला.
निमित्त होते, महू व हातगेघर धरणबाधितांच्या वहागाव आणि कुडाळ या गावाला भेटींचे. या दोन्ही गावातील काही जणांच्या पुनर्वसनाबाबत त्यांचे काही प्रश्‍न आहेत. ते जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी या दोन गावाना प्रत्यक्ष भेटी दिल्या.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

कुडाळी प्रकल्पांतर्गत महू येथे कुडाळी नदीवर महू धरण 1.10 टीएमसी व हातगेघर नाल्यावर हातगेघर धरण 0.26 टीएमसी एवढी क्षमता असलेली दोन धरणे बांधून एकूण 1.36 टीएमसी एवढा पाणी साठा करण्याचे प्रस्तावित आहे. या धरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून जे काम शिल्लक राहिले आहे.
या दोन्ही धरणाबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणबाधितांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष बाधित लोकांना भेटी घेण्यावर भर दिला आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व धरणांना आणि धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचे काम आता युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
वहागाव हे गाव महू धरणात पूर्णत: बाधीत असून या गावाच्या पुनर्वसनासाठी जागा शासनाने दिलेली आहे. काही प्रकल्प बाधीतांचे भूमी संपादनाबाबतचे काही प्रश्‍न आहेत ते आज जिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यातील जी धरणे पूर्ण झालेली आहेत पण पुनर्वसनाचे प्रश्‍न प्रलंबीत आहेत ते सोडविण्याच्या विषयाबाबत जिल्हाधिकारी गंभीर आहेत. त्यासाठी धरणग्रस्तांच्या गावात जावून त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याबाबत आग्रही असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधीक्षक अभियंता श्री. घोगरे म्हणाले, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत भारतातील 99 प्रकल्प आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 26 तर सातारा जिल्ह्यातील 5 प्रकल्पांचा समावेश आहे.यात महू व हातगेघर या प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन्ही धरणांचे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने दिले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत असलेल्या धरणांच्या कामाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळो वेळी आढावा घेत आहेत. महू व हातगेघर धरण पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या लागणार्‍या सर्व मंजुर्‍या मिळालेल्या आहेत.
मी आणि जिल्हाधिकारी गावोगावी जावून धरणग्रस्तांचे प्रश्‍न ऐकूण ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जून 2018 पर्यंत धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्याच्या दृष्टीने आमचे कामकाज सुरु आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments