पाडळीत दोन युवकांवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, January 13, 2018

पाडळीत दोन युवकांवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक


सातारारोड@ सत्य  सह्याद्री न्यूज नेटवर्क 
कोरेगाव तालुक्यातील  पाडळी येथील जरंडेश्‍वर ढाब्याचे जुने बील मागितल्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून हॉटेल मालकासह त्याच्या मित्रावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांवर सातार्‍यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, याप्रकरणी अमर सर्जेराव राक्षे व जितेंद्र मधुकर पंडीत यांना अटक करण्यात आली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाडळी येथील विशाल रामदास सावंत यांचा जरंडेश्‍वर ढाबा असून, शुक्रवारी रात्री ते स्वत: व आरफळ, ता. सातारा येथील त्यांचे मावसभाऊ मारुती वसंत साबळे हे ढाब्यावर थांबले होते. पाडळीतीलच अमर सर्जेराव राक्षे व जितेंद्र मधुकर पंडीत हे ढाब्यावर आले आणि त्यांनी जेवणाचे पार्सल मागितले. दरम्यान विशाल सावंत याने पंडीत याच्याकडे जुने बील येणे बाकी असून, ती रक्कम मागितली. त्याचा राग अनावर झाल्याने त्यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. जेवणाचे पार्सल नेत असताना जितेंद्र पंडीत याने मारुती साबळे यांना विशाल याला समजावून सांगा, नाही तर लय जड जाईल, अशी धमकी दिली.

विशाल सावंत व त्याचा मित्र सागर महादेव महाजन हे दोघे रात्री 11 च्या सुमारास हॉटेल बंद करुन मोटारसायकलवरुन गोटीचा माळ ते पाडळी रस्त्यावरुन घरी चालले होते, रस्त्यात असलेल्या पंडीत विहिरीजवळ अमर राक्षे व जितेंद्र पंडीत यांनी दोघांना अडविले आणि धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत ते खाली पडलेे, त्यानंतर मारुती साबळे व अन्य मित्रांनी दोघांना तातडीने सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. याप्रकरणी मारुती साबळे यांनी तक्रार दाखल केली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर राक्षे व जितेंद्र पंडीत यांना रितसर अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे व सहाय्यक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment