आकर्षक चित्र रथामुळे शोभायात्रेत रंगत: ऐतिहासिक, पांरपारिक, समाजप्रबोधनपर चित्ररथांचा सहभाग, जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 11, 2018

आकर्षक चित्र रथामुळे शोभायात्रेत रंगत: ऐतिहासिक, पांरपारिक, समाजप्रबोधनपर चित्ररथांचा सहभाग, जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा


यशवंतनगर @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सह्याद्रि साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या                       क्रिडांगणावर आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 23 व्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याच्या तिसर्‍या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.लक्ष्मी गायकवाड, कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते नगरसेवक सौरभ पाटील, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौ.संगिता साळुंखे, उद्योजक रणजित पाटील (नाना), सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सदस्य गोविंदराव थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.सी.बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सौ.लक्ष्मी गायकवाड यांनी स्काऊट गाईड्सना गडद निळ्या रंगाचा ध्वज दाखवून क्रिडांगणाच्या प्रवेशद्वारावरून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा कारखाना-मसूर रस्त्याने पिंपरी-शहापूर फाट्यापर्यंत जावून परतीच्या वाटेने येताना कारखाना कार्यस्थळावरील स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुतळयास अभिवादन करून पुन्हा क्रिडांगणावर आली.





यामध्ये देशातील सर्वधर्म संहिष्णूता, भारतीय एकतेचा संदेश देत, बेटी बचाओचा नारा देवून सोबत पर्यावरण, स्वच्छ भारत, अंद्धश्रद्धा निर्मुलन, व्यसन मुक्ती व समाजप्रबोधनपर आकर्षक चित्ररथांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व जाती, रंग, रूप, वेष, भाषा सर्व एकच असल्याचा संदेश सादरीकरणातून दिला. ऐतिहासिक चित्ररथामध्ये छ.शिवाजी महाराज, शंभूराजे, झाशीची राणी, उमाजी नाईक अशा व्यक्तिरेखा मुलांनी साकारल्या.
महाराष्ट्राची थोर परंपरा असलेल्या वारकरी सांप्रदायाची दिंडी, आदिवासी नृत्य, सासन काठी, पालखी, गजी नृत्य, वासूदेव, पोतराज अशा पारंपारीक लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथही सहभागी झाले होते. यशवंतनगर येथील संयोजक शाळेचा छ.शिवाजी महाराज यांचा घोडेस्वारीवरील जीवंत देखावा, विठू माऊलीसह संत मेळा व आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांच्या कार्यावरील जीवनरथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कराड येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्याने साकारलेली आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांची वेषभूषा लक्षणीय ठरली. एकूणच शोभायात्रेतील ढोल, ताशा, लेझीम, झांज पथक, तुतारी, धनगरी नृत्यासह पारंपारीक वाद्यांनी परिसर दुमदुमुन गेला.

दरम्यान आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब स्फुर्तीस्थळावर शोभायात्रेचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी सौरभ पाटील, लक्ष्मीताई गायकवाड यांनी शोभायात्रेतील स्काऊट आणि गाईड्सना शुभेच्छा देताना, या मेळाव्यातून सामाजिक ऐक्य, स्वच्छता, स्वयंशिस्त, संस्कार वाढीस लागतील अशी आशा व्यक्त केली व स्काऊट गाईड्ना शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांचे स्वागत मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रकाश पाटील (बापू) यांनी केले, संभाजी चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment