Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय सैन्याच्या शौर्यकथांवर वक्तृत्व स्पर्धेत निष्ठा फडके, गौरव कदम सर्वोत्तम


पुणे@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
परमहीत या लष्करातील माजी अधिकार्‍यांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय सैन्यातील शूरवीरांच्या कथांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धेत अनंत इंग्लिश स्कूल सातार्‍याचे निष्ठा फडके व गौरव कदम हे दोघे अंतिम फेरीत अव्वल राहिले. त्यांचा ब्रिगेडीयर अनिल तळवलकर यांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरव करण्यात आला. हा अंतिम फेरीचा सोहळा पुणे येथील एमईएस ऑडिटोरियम येथे बुधवारी सायंकाळी रंगला. त्यामध्ये निष्ठा आणि गौरव यांच्या सादरीकरणाने वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना थक्क केले. कार्यक्रमानंतर पुण्यातील प्रेक्षकांनी जोरदार गर्दी करून निष्ठा फडके आणि गौरव कदम यांचे भोवती गर्दी केली. निष्ठाने केलेल्या वक्तृत्वातील बारकावे, शब्दोच्चार, भावनांचे प्रकटीकरण यामुळे उपस्थितांची मने जिंकली.



या स्पर्धेची प्राथमिक फेरी २० रोजी सातारा येथे झाली होती. त्यातून सातारच्या तिघांची अंतिम फेरीमध्ये निवड झाली होती. पुण्यातील अंतिम फेरीत पुण्याच्या नामांकीत शाळा व महाविद्यालयांच्या स्पर्धकांशी स्पर्धा करत या दोघांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अशोकचक्र विजेत्या तुकाराम ओंबळे यांचे कथानक सांगायला निष्ठाने सुरूवात करताच उपस्थित प्रेक्षकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांना या शौर्यकथेतील भावनीक प्रदर्शनाने आपले अश्रू अडवता आले नाहीत. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा प्रसंग आपल्या शब्दचातुर्याने निष्ठाने जीवंत उभा केला आणि तुकाराम ओंबळेंच्या पराक्रमाबद्दल अभिमान वाटेल असे सादरीकरण केले.
भारतीय सैन्यातीय माजी अधिकारी कर्नल नाफड, ब्रिगेडीयर भट, ब्रिगेडीयर अनिल तळवलकर यांनी भारतीय नागरिक आणि लष्कर यांच्यात समन्वय असण्यासाठी एक चळवळ सुरू केलेली आहे. त्या चळवळीचा भाग म्हणून लष्करात शहीद झालेल्या जवान, परमवीर चक्र, अशोक चक्र विजेत्यांच्या शौर्य गाथांचे सादरीकरण करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला आहे. यातून प्रेरणा मिळून भारतीय लष्कराची सर्वांना ओळख व्हावी आणि आधुनिक भारताचा इतिहास सर्वांना समजावा ही त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध शाळांमध्ये जावून परमवीर चक्र, अशोक चक्र विजेत्या जवानांची माहिती देण्याचे काम परमहित संस्थेने केलेले आहे. विद्यार्थ्यांचा ताण तणाव कमी करून त्यांच्यातील शक्ती जागवून देशकार्याला प्रेरित करण्याचे व्रत या संस्थेने हाती घेतले आहे.

Post a Comment

0 Comments