Ticker

6/recent/ticker-posts

फलटण तालुक्यातील ६० गावामध्ये प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा


फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शासन आणि जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार फलटण तालुक्यात प्रजासत्ताक दिनी विविध ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभांचे आयोजन करुन शासकीय योजना आणि ग्रामविकासाचे नियोजन करण्याबाबत पंचायत समितीच्या सभापती सौ. रेश्माताई भोसले व गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील 60 गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले उर्वरित गावात त्यानंतर ग्रामसभा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

शासन 14 वा वित्तआयोग व अन्य निधी ग्रामपंचायत बँक खात्यावर थेट जमा करीत असून या निधीचे प्रमाण मोठे असल्याने ग्रामपंचायतीने या निधीचा विनियोग करताना ग्रामसभाद्वारे त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे अशी अपेक्षा सभापती व गटविकास अधिकार्‍यांनी व्यक्त केली होती त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनीही ग्रामसभांसाठी विषय पत्रिका निश्‍चित करुन सदर विषयावर ग्रामसभांमध्ये चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार या ग्रामसभा संपन्न झाल्या.

या ग्रामसभांमध्ये नियमित विषयांशिवाय आमच गाव, आमचा विकास कार्यक्रमांतर्गत वार्षिक विकास आराखडा ग्रामसभेसमोर ठेवुन त्यास मान्यता देणे, सन 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या तीन वर्षात 14 व्या वित्त आयोगातून उपलब्ध झालेला निधी मार्च अखेर 100 टक्के खर्च करणे अपेक्षित असल्याने या निधींतर्गत सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा या सभांमधून घ्यावा, ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख वर्गीकरण, 6 संच (गठ्ठे) पध्दती व झिरो पेंडसी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजलचा आढावा घेणे, शालाबाह्य मुलांबाबत तसचे बालमजुरी कमी करणेबाबत, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेणे, प्रधानमंत्री आवास योजना तसेच राष्ट्रीय कृषी बाजार योजना वगैरे विषयावर या ग्रामसभांमध्ये चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे काही स्थानीक विषयही याग्रामसभांमधून चर्चीले गेले. 

Post a Comment

0 Comments