जांभूळणी /सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
माण तालुक्यातील जांभूळणी हद्दीतील लाडेवाडी येथील पाझर तलावात पाडलेल्या विहिरीतून बेकायदा पाणीउपसा सुरु आहे. यामुळे पाझरतलावाखाली राहणार्या गावकर्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या प्रकाराला महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून पाठबळ मिळत असून आवाज उठवणार्या गावकर्यांविरोधातच खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. याप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून याप्रकरणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे.
याबाबत माहिती अशी, जांभूळणी येथील लाडेवाडी पाझर तलावातील काही जमीन वळई येथील हणमंत भोजा काळेल यांनी खरेदी घेतली असून पाझर तलावात असणार्या या क्षेत्रात त्यांनी विहीर पाडली आहे. या विहिरीतून त्यांनी त्यांच्या वळई येथील शेती व काही प्रकल्पांसाठी पाणी नेले आहे.
ही विहीर पाझर तलावात असल्याचा आरोप करत विहिरीवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने महसूल विभागाकडून या विहिरीची नोंद झालेली नाही. काही गावकर्यांचा विरोध असतानाही काळेल यांच्याकडून विहीरीतून पाणीउपसा सुरु आहे. गावकरी विरुद्ध काळेल यांच्यादरम्यानचा एक दावा सध्या म्हसवड न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे याचा निकाल लागेपर्यंत येथून पाणी उपशास बंदी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
यासंदर्भात तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, अगदी प्रांतांपर्यंत तक्रारी करुनही काळेल यांनाच यंत्रणा मदत करत आहे.
विहीरीवरील पाईपलाईनची मोडतोडही काही दिवसांपूर्वी झाली होती. यावरून काही गावकर्यांनीच मोडतोड केल्याबाबतचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला असून म्हसवड पोलीसही गावकर्यांवरच खोटे गुन्हे दाखल करत आहेत.
यासंदर्भात जांभूळणीच्या सरपंचांनी वीज कंपनीकडे या विहिरीचा अनधिकृत वीजपुरवठा बंद करावा, अशी मागणी केली आहे. शिवाय तलाठ्याकडे या विहिरीची तसेच बोअरची नोंद करू नये व पाणी उपसा करणार्यास मज्जाव करावा, अशी मागणी तलाठ्याकडे केली आहे.
म्हसवडचे पोलीस प्रशासन केवळ काळेल यांच्या बाजूनेच वागत असून गावकर्यांनाच दमदाटी केली जात असल्याची तक्रार असून याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आहे.
तसेच महसूल विभाग अर्थपूर्ण तडजोडीमुळे गप्प असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी स्वत: याबाबत पाहणी करून न्याय द्यावा, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

2 Comments
Hi khoti batami ahe. This is wrong news.
ReplyDeleteHi khoti batami ahe. This is wrong news.
ReplyDelete