तरसवाडी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
आजकालच्या धावपळीच्या युगात आणि पाश्चात्य संस्कृतीच्या मार्यात आणि प्रसारमाध्यमांच्या अतिरेकामुळे समाज विघातकतेकडे जास्त प्रमाणावर झुकू लागलायं. हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे आणि आपण गावाचे, समाजाचे काहीतरी देणे लागतो, या विचाराने झपाटलेला एक निवृत्त मेजर झटतोय आपल्या गावाला विधायकतेकडे नेण्यासाठी झटतोय. या निवृत्त मेजरचे नाव आहे अंकुश पवार. विशेष म्हणजे सार्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवराय आणि शिवरांच्या जयंतीचे औचित्य साधून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम तरसवाडीत राबविण्यात आले. या शिवजयंतीमुळे तरसवाडीतील युवकांमध्ये नवा जोश संचारला शिवाय इथल्या अनोख्या शिवजयंतीची चर्चा सर्वदूर पोहोचली. यंदाचे शिवजयंतीचे तिसरे वर्ष आहे.
खटाव तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर जेमतेम एक हजार लोकसंख्या असणारे तरसवाडी गाव इथल्या नाविन्यपूर्ण शिवजयंती उत्सवामुळे चर्चेत आले आहे. शिवजयंती निमित्त ता. 17, 18 व 19 फेब्रुवारी रोजी गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल होती. यामध्ये शाळेतील मुलांना शिवचरित्राची ओळख व्हावी तसेच प्रेरणा मिळावी म्हणून गावातील शाळेत शिवचरित्रावर चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थी, गावातील तरुण मंडळी व इतर ग्रामस्थ यांनी मिळून ग्राम-स्वच्छता अभियान राबवून गावाची साफसफाई करून घेतली. शिवरायांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाइक-जाधव यांचे बाणुरगडावरील समाधिस्थळाची स्वच्छता व मानवंदना मोटर साईकल रैली काढून देण्यात आली. सर्वांमध्ये एकजूट, सांघिक भावना व एकोपा वाढविण्यासाठी वर्धनगडावरून ज्योत आणण्यात आली. कुठल्याही डीजे किंवा डॉल्बी न वापरता ढोल-ताशांच्या गजरात पालखीमधून शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ‘मावळा ग्रुप’ च्या प्रयत्नातून व ‘यशवंतराव चव्हाण रक्तपेढी’ यांच्या संयुक्त विद्यमाने गावामधे पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला ग्रामस्थांनी ऊस्फूर्त प्रतिसाद दिला. शिवचरित्रावरील व्याख्यानमालेत पूनम मोरे, दिघंची व प्रा. अरुण घोडके, इस्लामपुर यांनी शिवचरित्रावरती प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे प्रा. अरुण घोडके यांनी आपल्या व्याख्यानात या विधायक प्रयत्नांची प्रशंसा केली तसेच तरुणांनी शिवचरित्र समजण्यासाठी गडकिल्ल्यांना भेटी देऊन शिवचरित्रापासून प्रेरणा घ्यावी असे सुचविले. जो समाज व देश आपला इतिहास विसरतात व इतिहासापासुन काही शिकत नाहीत त्या समाजाची प्रगती खूंटते असे त्यांनी प्रतिपादन केले.
गावामधील तरुण मुलांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी ‘मावळा ग्रुप’ ची स्थापना शिवजयंती साजरी करण्यासाठी केली होती. येथील लष्करातील निवृत्त मेजर अंकुश पवार यांनी तरुणांना विधायक कामाकडे वळविण्यासाठी या संकल्पनेला तरुणांच्या मनामध्ये रुजविले होते. ही संकल्पना आता चांगलीच रुजली असून अंकुश पवार यांच्या प्रयत्नांचा आदर्श इतर गावांनीही घेण्यासारखा असाच आहे.




0 Comments