फलटण/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या ऐवजी त्यांचे पती मिलींद नेवसे हे नगर परिषदेच्या कारभारात ढवळाढवळ करीत आहेत. हा प्रकार निंदनीय आहे. त्याची रितसर तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली जाईल. नगराध्यक्षाही नगरपरिषदेत हजर नसतात. जर नगराध्यक्षा त्यांच्या दालनात उपस्थित नसतील तर नगराध्यक्ष यांच्या दालनाबाहेर असलेल्या त्यांच्या नावाच्या पाटीस चपलांचा हार घालण्यात येईल असा इशारा नगरसेवक व गटनेते अशोक जाधव यांनी दिला आहे.
अशोक जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, फलटण नगर परिषदेची निवडणूक होवून दीड वर्ष होत आले आहे. महाराष्ट्र सरकारने लोकनियुक्त नगराध्यक्ष नेमून एक प्रकारे जनतेला आपल्या मनाप्रमाणे नगराध्यक्ष निवडण्याचा हक्क दिला. परंतु, फलटण नगरपरिषदेत लोकभावनेला पायदळी तुडवून नगराध्यक्षा निता मिलींद नेवसे यांच्या ऐवजी त्यांचे पती मिलिंद नेवसे हेच कामात ढवळाढवळ करीत आहेत.
नगराध्यक्षांनी त्यांचे पालिकेतील दालनात बसून नगर पालीकेचा कारभार करावा असे जनतेला अपेक्षित होते. परंतु तसे न होता नगरपरिषदेचे कर्मचारी, अधिकारी, कॉन्ट्रक्टर यांना घरी बोलावून नगरपरिषदेचे कामकाज सध्या सुरू आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांचे प्रमाणेच नगराध्यक्षाही नगरपरिषदेत पहावयास मिळत नाहीत. मिटींग, जयंती किंवा पुण्यतिथी एवढ्या कामापुयत्याच नगराध्यक्षा नगरपरिषदेत उपस्थित असतात. पुढील काळात असा प्रकार होणार असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे जर यापुढे नगराध्यक्ष व अन्य महिला नगरसेविकांचे पती यांचा नगरपालिकेतील हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
आपण फलटण शहरातील जनतेच्या मतांवर निवडून आलेला आहात. शहरातील जनतेची सेवा करणे, त्यांचे हिताचे काम करणे व त्यांचेसाठी नगरपरिषदेत उपस्थीत असणे हे नगराध्यक्षांचे काम आहे. त्यामुळे यापुढे जर नगराध्यक्षा त्यांच्या दालनात उपस्थीत नसतील तर दालना बाहेर असणार्या त्यांच्या नावाच्या पाटीला चप्पलांचा हार घालणेत येईल असा इशारा अशोक जाधव यांनी दिला आहे.
स्वीकृत नगरसेवक काँग्रेसचाच होणार
काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सदर रिक्त जागेवर काँग्रेसच्या नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. परंतु या जागी राष्ट्रवादीचाच नगरसेवक होणार अशी कंडी पिकविली जात आहे. राष्ट्रवादीने मुर्खाच्या नंदनवनात राहु नये असा चिमटाही अशोक जाधव यांनी काढला आहे.

0 Comments