फलटण/ सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
ग्राहकास आपल्या हक्कांची जाणीव करुन देणे व त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला प्रामाणिक सेवा देणे हे ग्राहक पंचायतीच सेवाभावी उद्दीष्ट आहे. ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या कितीही संस्था असल्या तरी 'ग्राहक हित' हे त्यांचे अंतिम ध्येय असायला हवे असे प्रतिपादन ग्राहक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार किसनराव भोसले यांनी केले.
फलटण तहसिल कार्यालय येथे जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या प्रसंगी नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे, अंकुश इवरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे फलटण तालुका अध्यक्ष मेजर डॉ. मोहन घनवट, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे फलटण तालुका अध्यक्ष अरविंद आढाव, पत्रकार स. रा. मोहिते, किरण बोळे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ग्राहक चळवळीत उत्कृष्टपणे काम करणारा तालुका अशी ओळख फलटण तालुक्याची सर्वश्रुत होती. ती ओळख पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी आता ग्राहक चळवळीत काम करणा-या प्रत्येक कार्यकत्याची आहे, असे सांगुन भोसले म्हणाले की समाजातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. घेणारा व देणारा जर जागरुक असेल तर लुबाडणूक निश्चितपणे टळेल. प्रत्येक महिन्यात सर्व विभागांचे अधिकारी व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व सदस्य यांची बैठक होणे आवश्यक असुन अशा बैठकी सुरु होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत अशी मागणीही भोसले यांनी यावेळी केली.
प्रत्येक व्यक्ती ही ग्राहकाच्या भुमिकेत येत असते. जर ग्राहकावर आन्याय होत असेल व त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल, तर ग्राहक चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा कायद्याचा अभ्यास असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे यांनी केले. ज्या प्रश्नी आपणास दाद मागायची आहे त्याचा परिपुर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. ग्राहक चळवळीत नव्याने जे काम करीत आहेत त्यांना व्यापक व सखोल मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे सांगून प्रशासनाच्या माध्यमातुन आमचे आपणास परिपुर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही भोईटे यांनी यावेळी बोलताना दिली.
कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत पुरवठा निरीक्षक शिवाजी फडतरे यांनी केले. आभार मनोज काकडे यांनी मानले. कार्यक्रमास स्वस्त रेशन धान्य संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व ग्राहक चळवळीत काम करणारे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

0 Comments