Ticker

6/recent/ticker-posts

तलवारी उपसल्या, नेम कुणावर? सातारा लोकसभेसह विधानसभेलाही रंगणार हायव्होल्टेज मुकाबला


सातारा/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक कापून आमदार शिवेंद्रराजे व विधानपरिषदेचे सभापती रामराजेंनी एकाच अ‍ॅक्शनमध्ये तलवारी उपसल्या. मनोमीलन फिसकटल्यापासून सातारचे राजकारण भलत्याच वळणावर आहे. आता दोघांनी उपसलेल्या तलवारींचा नेम कुणावर आहे? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असले तरी 2019 ची सातारा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मात्र हायव्होल्टेज मुकाबला होणार आहे, हे नक्की.
सातारच्या नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रराजेंची नगरविकास आघाडीतील मनोमिलनाचा घटस्फोट झाला. खासदार उदयनराजे म्हणजे कुणालाही न ऐकणारे नेतृत्व त्यामुळे अख्ख्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी जेरीला आलेली त्यापुळे शिवेंद्रराजे तरी काय? नगरपोलिकेत नगरविकास आघाडीला जोरदार पराभव स्वीकारावा लागला आणि सातारच्या राजकारणात नव्याने भाऊबंदकीची ठिणगी पेटली. त्यातच झालेल्या  सुरुचिवरील राड्याने आणखीन होरपळ झाली. अनेकांना दिवाळीसुद्धा खाता आली नाही. तरीदेखील दोन्ही नेत्यांचे वाढदिवस मात्र दणक्यात झाले. शहरभर बॅनरयुद्ध रंगले, काहीकाळ पत्रकबाजीही रंगली होती.
आता मनोमीलन होण्याची सूतराम शक्यता नाही.
जावलीच्या कार्यक्रमात आता मनोमीलन कायमचे तडीपार केले आहे. पुन्हा तडजोड नाही. मला अडवण्याची कुणात धमक नाही,’ असे जाहीर विधान करून आक्रमक बाणा दाखवणार्‍या आ. शिवेंद्रराजेंनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बॅँकेच्या सभागृहात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा हात हातात घेवून तलवारीने केक कापला. दोघांनीही दोन वेगवेगळ्या तलवारी उंचावल्या. आ. शिवेंद्रराजेंची ही देहबोली नव्या राजकीय रणनीतीचे संकेत देऊन गेली.
त्याचे असे घडले की, जावलीच्या कार्यक्रमात आ. शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे संकेत दिले. आता तडजोड नाही, असे सांगत आ. शिवेंद्रराजेंनी भविष्यातील वाटचाल अधिक आक्रमक असल्याचे सूचित केले. इकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह आ. शिवेंद्रराजे भोसले या मेळाव्यास उपस्थित होते.
मेळाव्यातील मान्यवरांच्या भाषणानंतर विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा केक मांडण्यात आला. या केकवर दोघांचीही नावे होती. कार्यकर्त्यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हातात तलवार दिली.  तर रामराजेंच्या हातातही दुसरी तलवार देण्यात आली. दोघांनीही तलवारीला हात लावून वाढदिवसाचा केक कापला व पुन्हा आपापल्या तलवारी उंचावल्या. दोघांनीही
एकमेकांना केक भरवला. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडच्या काळात ना. रामराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्यातील राजकीय भूमिका एकमेकांना पूरक आहेत. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या  निमित्ताने या भूमिकेला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे. रामराजेंच्या साथीने शिवेंद्रराजेंनी पुढच्या राजकीय रणनीतीची चुणूकच दाखवली.
त्यामुळे दोघांनी उपसलेल्या तलवारीचा नेम एकावरच आहे, हे सूज्ञ मतदारंना सांगण्याची गरज नाही. त्यातच जनतेतून लढण्याची रामराजेंची इच्छाही लपून राहिलेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सभागृहात रामराजे-शिवेंद्रराजे यांनी तलवारी उपसून पुकारलेला एल्गार येत्या वर्षभरात कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

Post a Comment

0 Comments