सातारा/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खंडणीचा गुन्हा दाखल असलेले आणि माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यावरील मोक्काचे कलम शनिवारी रद्द करण्यात आले. मोक्काचे कलम रद्द झाले असले तरी त्यांच्यावरील खंडणीचा गुन्हा कायमच असून लवकरच गोरे माणमध्ये परतण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
माणमधील एका पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या कारणावरून शेखर गोरे व म्हसवडच्या नगरसेवकासह आणखी काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील दोघांना अटकही झाली होती. या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता सातारचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गोरेंच्या टोळीला मोक्का लावण्याची शिफारस केली होती. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता. तेव्हापासून शेखर गोरे अज्ञातवासात आहेत.
गोरे यांना मोक्का लावल्यानंतर राष्ट्रवादीनेही आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत होता. अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी शेखर गोरे यांच्यावरील मोक्काचा सेक्शन रद्द केला असून त्यांच्यावरील खंडणीचा गुन्हा कायम असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गोरेंवरील मोक्का रद्द झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आता वाघाची लवकरच रॉयल एंट्री, 2019 ला आमदार शेखर गोरेच, असे मेसेज व्हायरल झाले होते.
सोमवारी 2 एप्रिल रोजी शेखर गोरे यांचा वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त मतदारसंघात त्यांचे बॅनर झळकत असून आता गोरेंची एंट्री त्याचदिवशी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

0 Comments