सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यांविरुध्द तीव्र मोहिम उघडली असून सोमवारी दिवसभरात सात ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 11 जणांना अटक करुन सुमारे 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी त्या त्या परिसरात कारवाई केल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली होती.
अमोल जाधव, विजय येवले, राजेश पुणेकर, विजय जाधव, अनिरुध्द वायदंडे, सागर शिंदे, दत्ता पवार, अक्षय वाघमारे, समीर कोतवाल, शंकर भोसले, झाकीर हुसेन शेख (सर्व रा.सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातील लक्ष्मी टेकडी, हॉटेल पालवी पाठीमागील परिसर, कोडोली, एलबीएस कॉलेजमागील परिसर, तेली खड्डा याठिकाणी बिनधोकपणे जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची चार पथके करुन पोलिसांनी परिसरात छापा टाकल्यानंतर अनेक संशयितांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर घटनास्थळाचे पंचनामे केले. सर्व संशयितांनी पोलिस व्हॅनमध्ये घातल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. संशयितांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरु होती.
पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजू पुजारी, अनिल स्वामी, निलेश गायकवाड, शिवाजी भिसे, अमित यादव, ज्योतीराम पवार, अशोक माने या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, सातारा शहर परिसरात ज्या ठिकाणी जुगार, मटका व्यवसाय सुरु आहे त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोनि सारंगकर यांनी केले आहे.

0 Comments