सातारा : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक निर्णय घेत आहेत. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असून न्यायालयीन बाब असल्याने अडचण येत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस चुकीचा प्रचार सर्वसामान्यांच्यामध्ये करत असून लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सातार्यात केला.
बुधवारी रात्री ते सातार्यात शासकीय विश्रामगृहात आले असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी तब्बल दीड तास संवाद साधला. त्यांचे स्वागत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, माजी जिल्हाध्यक्ष अड. भरत पाटील, ज्येष्ठ नेते डा. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, अॅड. नितीन शिंगटे, पालिकेचे गटनेते मिलिंद कांकडे, नगरसेवक धनंजय जांभळे, सिद्धी पवार, प्राची शहाणे, माजी नगरसेवक अॅड.प्रशांत खामकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, महेश शिंदे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, सरकारने दोन वर्षात मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राजर्षी शाहु महाराज योजना, पंजाबराव देशमुख वसतीगृह योजना या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केल्या आहेत, असे सांगत ते म्हणाले, याच मंडळीकडून शेतकर्यांचेही आंदोलन घडवून आणले जात आहे. शेतकर्यांसाठी कर्जमाफी योजना केले. आघाडी शासनाच्या काळात 2007 मध्ये 12 हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केली होती.
बँकांना ती देणी दोन वर्ष मिळाली नव्हती. आता मात्र भाजपा सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. व्यक्तीगत असा लाभ शेतकर्यांना दिला आहे. शेतकर्यांच्या शेती मालालाही हमी भाव दिला गेला आहे, प्रकर्षाने हे मुद्दे जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवले पाहिजेत.

0 Comments