Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आंदोलनाने माणदेश थरारला






सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

म्हसवड : मराठा समाजाच्या  मागण्यांसाठी म्हसवड बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर म्हसवड शहरातून निषेध मोर्चा काढून एस  टी  स्टॅण्डसमोरील  रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागातील बहुसंख्य सकल मराठा समाजाने म्हसवड बंद ठेवून चक्काजाम आंदोलन केले यावेळी बसस्थानक चौकात मोर्चेकरूनी तब्बल चार तास सातारा-पंढरपूर राज्यमार्ग रोखून धरला होता.


सकाळी 10 वाजता शांततेत या मोर्चाला सिध्दनाथ मंदिरापासून सुरवात होऊन मेन पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महात्मा फुले चौकातून पुढे बसस्थानक चौकात सातारा-पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.


छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक निकषावर आरक्षण दिले. त्याच धर्तीवर आरक्षण लागू केल्यास सर्व समाजाचे हित साधेल. आगामी काळात आरक्षण नाही मिळाले तर तरुण पिढी शिक्षणही घेऊ शकत नाही. गोरगरीब मराठा समाज शिक्षण घेऊ शकत नाही. निकषानुसार आरक्षण मिळावे. सातारा जिल्हा क्रांतीकारकांचा आहे. सातारा जिल्ह्याने राज्याचे नेतृत्व करावे. आगामी काळात मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करावा. आरक्षण घेतल्याशिवाय थांबू नका असे अनेकांनी भाषणात सांगितले.  आंदोलन सर्वत्र शांततेत झाले.  इतर समाजातील नागरिकही मोर्चात  सहभागी झाले होते.


‘एक मराठा, लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चा, मी मराठा अशा संदेशाच्या भगव्या आणि पांढर्‍या टोप्या, गळ्यात भगव्या रंगाचे वस्त्र, डोक्यावर भगवा फेटा अशा तयारीनिशी मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते. काळे टी-शर्ट, पांढरे शर्ट, भगवे कुडते अशी प्रामुख्याने या मोर्चेकर्‍यांची वेशभूषा होती.  मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा इशारा मराठा समाजाने दिला. मुख्य चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून, याला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला.  यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख ,विलास माने, नगराध्यक्ष तुषारशेठ विरकर  बाळासाहेब माने  अजितराव राजेमाने, विजय जगताप, वसंतराव जगताप  रावसाहेब बाबर यांची भाषणे झाली .


आरक्षणासाठी मी तुमच्याबरोबर: आमदार गोरे

आमदार गोरे म्हणाले, मराठा समाज्याच्या न्यायहक्कासाठी आरक्षण हा विषय महत्वाचा असून महाराष्ट्राच्या विधानसभेत वेळोवेळी यावर मी आवाज उठवला आहे. मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी समाज्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमदार म्हणून माझी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली ...

आरक्षण आमच्या हक्काचे .. नाही कुणाच्या बापाचे, मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत मराठा समाजाच्या सार्थ हाकेने अवघी सिद्धनाथ नगरी दुमदुमली. हृदयाला पाझर फोडणार्‍या तरुणाईच्या हाका काळीज पिळवटून टाकणारा होता. बंदच्या हाकेला समस्त म्हसवडकरांनी पाठिंबा दिला. मोर्चासाठी सकाळी आठ वाजल्यापासून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरवात झाली होती. उपविभागीय अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Post a Comment

0 Comments