Hot Posts

6/recent/ticker-posts

साविआत नि‘शांत’ता; गटबाजी नेत्यांच्या रडारवर, जलमंदिरमध्ये झालेल्या बैठकीत सदस्यांची कानउघडणी




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
 सातारा  : सातारा नगर परिषदेत साविआची सत्ता असून ज्येष्ठ सदस्यांनी नगराध्यक्षांना टार्गेट करताना बंदोबस्त करण्यासाठी आघाडीचे नेते खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे दाद मागणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, साविआच्या १४ सदस्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम सर्वसमावेशक काम करत असून निधीचे वाटप सर्वांच्या प्रभागात समप्रमाणात करत असल्याने कोणाच्या पोटात दुखत असेल तर आमचे राजीनामे घ्या, अशा स्वरात आपले गाऱ्हाणे उदयनराजेंसमोर मांडले. तदनंतर सर्वांना विकासकामे पूर्ण करण्यासाठी झटा, असा आदेश देत गटबाजीला थारा नसल्याचे खासदारांनी स्पष्ट केले.
साविआतील अंतर्गत धुसफूस वाढल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट झाले होते. उपाध्यक्षांसह गटनेत्या आणि पक्षप्रतोद एकवटल्याने नगराध्यक्षा माधवी कदम आघाडीचे निर्णय करताना मनमानी करत असल्याचे स्पष्ट करत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खा. उदयनराजेंच्या समोर हकीकत मांडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. चार दिवसांपूर्वी खा. उदयनराजे भोसले दिल्लीला मार्गस्थ होताच हा प्रकार सुरु झाल्याने उदयनराजे रविवारी साताऱ्यात दाखल होताच दोन्ही गट जलमंदिर येथे समोरासमोर आले. यावेळी त्यांचे म्हणणे तुम्ही ऐका नंतर आम्ही बोलू, असे उपाध्यक्ष राजेशिर्के यांचे म्हणणे बाजूला करून उदयनराजेंनी सर्वांना समोरासमोर घेतले. नगराध्यक्षांच्या बाजूला १४ तर समोर उपाध्यक्ष, गटनेत्या, पक्षप्रतोद, आरोग्य सभापती आणि ज्ञानेश्वर फरांदे बसल्यानंतर तक्रारींचा पाढा सुरु झाला. शुल्लक तक्रारी असल्याने ज्येष्ठ सदस्यांनी प्रथम नागरिक माधवी कदम यांच्यावर अविश्वास का दाखवावा? असा मार्मिक प्रश्न उपस्थित करून गेल्या दिड वर्षात निधी पळवण्याचे काम करणाऱ्यांनी घरी बैठका घेत टीका करू नये. आमची निष्ठा जलमंदिर आणि नेत्याशी असल्याचे लत्ता पवार यांनी सुनावले. दोन कोटीच्या रस्ते अनुदानातून तथाकथित ज्येष्ठ सदस्यांना दिड कोटी मिळणार असतील तर आम्ही काय नुसते बोट वर करायला पालिकेत आलो आहोत का? असा सवाल विशाल जाधव यांनी उपस्थित केला. चुकीची कामे होत असतील तर तात्त्विक वाद झाला पाहीजे, मात्र इगोसाठी टीका संयुक्तिक नसल्याचे सिता हादगे म्हणाल्या.
अधिवेशन सुरु असल्याने दोन दिवसानंतर उदयनराजे रविवारी साताऱ्यात दाखल झाले असताना सकाळीच आघाडीतील दोन्ही गट समोर आले आणि दोन दिवसातील धुसफूस बाहेर आली. यावेळी सदस्यांचे म्हणणे समजून घेत सौम्य शब्दात राजेंनी कानपिचक्या काढताना सूचना केल्या. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवा. सुरु असलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा. नव्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी वेळ द्या. अखर्चित निधी मार्गी लावा, अशा सूचना करताना उदयनराजेंनी सदस्यांशी संवाद करत अंतर्गत गटबाजी करणाऱ्यांना फैलावर घेतले. गटबाजी पोषक नसून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कामाचा डोंगर उभा करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रभागनिहाय कामांची यादी घेत लवकरच बैठक घेणार असल्याने प्रलंबित कामांचा पाठपुरावा करा. अडचण असल्यास मी मदत करतो. पण कुरघोड्या करण्यात वेळ वाया घालवू नका, अशा शेलक्या शब्दात राजेंनी साविआतील गटबाजीला रडारवर घेतले.
पक्षप्रतोद निशांत पाटील वाढदिवसाला दोन्हीकडे जातात, मात्र दोन्ही गटांना एकत्र का करत नाहीत, असा खोचक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सुजाता राजेमहाडीक, अनिता घोरपडे, राजू भोसले, आणि दत्ता बनकर बैठकीला का आल्या नाहीत असा सवाल ही करण्यात आला.
१५ व्हर्सेस ५ आणि चार अनुपस्थित...
उदयराजेंकडे नगराध्यक्षांच्या विरोधात उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, गट नेत्या स्मिता घोडके, पक्षप्रतोद निशांत पाटील,आरोग्य सभापती यशोधन नारकर आणि ज्ञानेश्वर फरांदे हे गेले असल्याचे समजताच काही वेळात ‘टीम नगराध्यक्षा’ जलमंदिर येथे दाखल झाली. चार जणांचा गट सत्तेत असूनही नामधारी असल्याप्रमाणे दिड तास रंगलेल्या जुगलबंदीत नेत्यांसमोर ‘दुध का दुध और पाणी का पाणी’ झाले.

गेल्या दोन वर्षात ‘त्या दोघी आणि चार चौघे’ असा कारभार पालिकेत सुरु असून अंतर्गत वादामुळे सातारकरांची त्रिधातीरपीट उडाली आहे. विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य सातारकर असला पाहीजे. मात्र, ठेकेदारीच्या विळख्यात अडकलेल्या मानसिकतेमुळे टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत असल्याने नागरिकांची करमणूक होत आहे.

Post a Comment

0 Comments