सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या सातार्यात बुधवारी मराठ्यांनी ठोक मोर्चा काढत आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या आंदोलनाला दगडफेकीने हिंसक वळण लागून गालबोट लागले. पोलीस आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक झाल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. बाँम्बे रेस्टॉरंट चौक, विसावा नाका, झेडपी चौकात सायंकाळी उशिरापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच धुडगूस घालणार्या आंदोलकांची धरपकड सुरु होती. दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह काही पोलीस अधिकारी व जवान जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत 75 जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, दगडफेकीत लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे.
सर्वपक्षीय पदाधिकार्यांसह मराठा बांधव मोठ्या संख्येने घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती.
मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. पण, या आंदोलनाची दाखल घेऊन सरकारने ठोस निर्णय न घेता समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे पेटून उठलेल्या मराठा समाजाने ठोक मोर्चे काढले आहेत. 9 वाजल्यापासूनच राजवाड्यावर मोर्चासाठी मराठा बांधव जमा होवू लागले होते. 10 वाजण्याच्या सुमारास गांधी मैदानावर सर्वत्र भगवा झेंडे हातात घेतलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर समन्वयक समितीने मोर्चाचा मार्ग जाहीर केला. एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या मोर्चात आमदार शिवेंद्रसिंह भोसले, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे यांच्यासह नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगनराध्यक्ष सुहास राजेभोसले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर, हरिष पाटणे यांच्यासह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा मोती चौक-देवी चौक-कमानी हौद चौक-शाहू चौक मार्गे पोवई नाक्यावर आला. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन मोर्चात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या युवतींच्या हस्ते जिल्हाधिकरी श्वेता सिंघल यांना देण्यात आले. दरम्यान, मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला असून हे ठिय्या आंदोलन बेमुदत सुरु राहणार आहे.
पोलिसांचा फौजफाटा
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे शहर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
एसटीची चाके थांबली
बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सकाळपासूनच बससेवा बंद ठेवली होती. शाळा व काही खासगी आस्थापनांनी बंद पाळल्याने शुकशुकाट होता. तरीही अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. बसस्थानकात शुकशुकाट होता. रिक्षाही बंद असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागली.
कडकडीत बंद, शुकशुकाट
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बेंदूर सण असूनही सर्व दुकाने पूर्णपणे बंद होती. वाहतुकीवर मात्र बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. शासकीय कार्यालये, बँका अर्धे शटर लावून तसेच दरवाजे बंद करुन सुरु होती. शहरात पूर्ण शुकशुकाट होता. रविवार पेठ, महात्मा फुले मंडई, राजवाडा मंडईमध्ये बंदमुळे शांतता होती.
आंदोलनाला हिंसक वळण
जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा विसर्जीत झाल्यानंतर महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपूल, वाढे फाटा व शिवराज पेट्रोलपंपाकडे कार्यकर्त्यांनी महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा फौजफाटा पोहोचेपर्यंत बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागले.जमावाने आक्रमक पावित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव हिंसक झाल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले.
पोलिसांनी पाठलाग करून 30 जणांना ताब्यात घेतले. महामार्गालगत असलेल्या शोरूमवरही आंदोलकांनी मोठी दगडफेक केली. पोलिसांना 5 अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 3 नंतर पुरेसा बंदोबस्त पोचल्याने तणाव निवळला.
पाटण तालुक्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद
पाटण वार्ताहर :- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यात बुधवारी मोरगीरी,ढेबेवाडी,तळमावले,तारळे आदी प्रमुख ठिकाणी बंद पाळला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी औरंगाबाद येथील सखल मराठा समाजाचा युवक काकासाहेब शिंदे याने स्वत: चे बलिदान देऊन जलसमाधी घेतली. या युवकाला ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली . यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी उपस्थित मराठा बांधवांनी केली. हे सरकार मराठा समाजाचा अजून किती अंत पाहणार अशा तीव्र भावना व्यक्त करून बुधवारी सकाळी मराठा समाज ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उतरला.
मोरगीरी येथे बसस्थानक परिसरात मोठय़ा संख्येने मोरणा विभागातील मराठा समाजातील.तरूण जमले.
त्यांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाचा निषेध केला . मोरगीरीसह पेठशिवापूर बाजारपेठ बंद करून पाठींबा दिला. तर खाजगी वडाप वाहतूक बंद करण्यात आली होती.
तारळे येथील मुख्य चौकात सकाळी मराठा समाजाने टायर पेटवून आंदोलन केले, तारळे ,बाजारपेठ सह खाजगी वाहतूक बंद करण्यात आली होती.
ढेबेवाडी या ठिकाणी सुद्धा आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन व्यापारी वर्गाने मराठा मोर्चाला प्रतिसाद दिला.
कराड-ढेबेवाडी मार्गावर घारेवाडी नजीक आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.या परिसरातील खाजगी रिक्षा, वढाप जिप वाहतूक हि बंद ठेवण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा,आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देत ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला होता..यावेळी पाटण पोलीस उपविभागीय अधिकारी अंगद जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

0 Comments