खाजगी सावकारकी विरोधात शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे संपर्क साधावा - रघुनाथराजे नाईक निंबाळकर - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 22, 2018

खाजगी सावकारकी विरोधात शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे संपर्क साधावा - रघुनाथराजे नाईक निंबाळकर


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

विक्रम चोरमले /फलटण: होळ ता.फलटण येथील उपसरपंच कै. विनोद भोसले यांनी केलेल्या आत्महत्या च्या घटनेला वेगळे वळण लागले असून दि.16 रोजी बडेखान ता.फलटण येथे त्यांना जबर मारहाण झाली असल्याची माहिती मिळत असल्याने त्यांना आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याने त्यांनी ही मारहाण झाल्याने गळफास घेऊन विनोद भोसले यांनी आपली जीवनयात्रा संपवली हे समजत असून त्यांना कोणी मारले याची माहिती पोलीसानी न घेता नातेवाईकांना धमकावत मृतदेह न्या नाहीतर आम्ही त्यांची विल्हेवाट लावू असे सांगितले या मुळे  हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न साखरवाडीच्या दोन पोलीस कर्मचारी यांनी केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.



फलटण तालुक्यातील होळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंचानी नुकतीच खाजगी सावकारकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी असून खाजगी सावकरकीच्या विरोधात फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आक्रमक भूमिका घेत आहे आत्महत्या करण्यापेक्षा बाजार समितिशी संपर्क साधावा असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.



फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बाजार समितीचे व्हा चेअरमन भगवानराव होळकर, सचिव बाळासाहेब सोनवलकर उपस्थित होते. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीमंत रामराजे व्यथा निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जातो खाजगी सावकारीची आलेली  जवळपास 142 हुन अधिक प्रकरणे पोलीस प्रशासन आणि सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या सहकार्याने सोडवून तक्रारदाराला न्याय दिला आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटिल यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले होते असे रघुनाथराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.



नुकतीच होळचे उपसरपंच विनोद भोसले यांनी खाजगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून केलेली आत्महत्या अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे यामध्ये दोषींच्या विरोधात कड़क कारवाई झाली पाहिजे आत्महत्येनंतर गुंह्या नोंद करुन घेण्यास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने केलेली चालढकल संतापजनक आहे. सदर  या प्रकरणी गुन्हा दाखल करताना, पंचनामा करताना मृतदेह ताब्यात देताना टाळाटाळ करणाऱ्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कार्रवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे तसेच पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास रास्ता रोको करू असा निर्वाणीचा इशारा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.



फलटण तालुक्याला खाजगी सावकारकी ही लागलेली मोठी किड असून तालुक्यातिल खाजगी सावकारकी संपवण्यासाठी पोलीसानी कड़क भूमिका घ्यावी. फलटण तालुक्यात फोफावलेलीं खाजगी सावकारकीबाबत नूतन पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी रघुनाथराजे यांनी केली. खाजगी सावकारकी बाबत मी स्वत: कायम कडक भूमिका ठेवत आलो आहे व यापुढेही ठेवणार आहे. खाजगी सावकारकीमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. खाजगी सावकार कोणत्या पक्षाचा, गटाचा आहे हे न बघता त्यांच्यावर कड़क कारवाई व्हावी. त्यामुळे माझी भुमिका ही कायम खाजगी सावकारा विरोधात राहणार आहे, असेही  रघुनाथराजे यांनी स्पष्ट केले.



नुकत्याच झालेल्या होळ येथील उपसरपंच यांच्या आत्महत्येची कल्पना कोल्हापुर परिक्षत्रेचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटिल यांना आपण देणार असल्याचे रघुनाथराजे यांनी स्पष्ट केले. होळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच कै.विनोद बबन भोसले यांनी नुकतीच आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्तीमुळे फलटण ग्रामीण पोलीसांनी केस दाखल करुन घेतली त्याबद्दल व कृषी उत्पन्न बाजार समितीची रुग्णवाहिका कै.विनोद बबन भोसले यांचे पार्थिव घरी नेण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध करुन दिल्याबद्दल साखरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच विक्रमसिंह पांडुरंग भोसले यांनी रघुनाथराजे यांचे  यावेळी आभार मानले. होळ येथे नुकत्याच घडलेल्या घटनेच्या संदर्भात सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना माहिती देण्यासाठी  रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता लवकरच आपण स्वत: बाजार समितीत येवून भेट घेऊन खाजगी सावकारकी विषयी कारवाई करू असे आश्‍वासन पंकज देशमुख यांनी रघुनाथराजेंना दिले.

No comments:

Post a Comment