सुधन्वाच्या समर्थनार्थ सातार्‍यात मोर्चा - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, August 25, 2018

सुधन्वाच्या समर्थनार्थ सातार्‍यात मोर्चा



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


सातारा   : मुंबई एटीएसने धर्माभिमानी  सुधन्वा गोंधळेकर यांना अन्यायकारक अटक केली आहे. सुधन्वा हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असून त्यांनी जिल्ह्यात नेहमीच संवैधानिक मार्गाने जनजागृती केली असल्याची मागणी करत सुधन्वा रहात असलेल्या करंजे पेठेतील नागरिक शनिवारी गोंधळेकर यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.



मुंबई एटीएस हिंदुत्वनिष्ठांना केलेली अटक ही कायदाबाह्य आहे. त्यामुळे समाजाचा- मुंबई एटीएसवरील संशय बळावला आहे. यापूर्वी मालेगाव बाँबस्फोटामध्येही साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनाही षड्यंत्रपूर्वक अडकवल्याची उदाहरणे आहेत. तरी वरील सर्व गोष्टी पहाता सुधन्वा गोंधळेकर यांना सन्मानाने मुक्त करावे. गोंधळेकर यांची मीडिया ट्रायलद्वारे होत असलेली मानहानी थांबवावी, अशी मागणी मोर्चाव्दारे करण्यात आली.



सनातन संस्था आणि तिचे साधक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृत करत आहेत, असे असूनही सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संघटनांवर नाहक बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा कडाडून विरोध केला जाईल, असा इशारा मोर्चाव्दारे देण्यात आला. सनातन संस्था तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा पुरोगाम्यांच्या हत्यांशी कोणताही संबंध नाही. आजवर कोणत्याच अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणांमध्ये एकाही हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेतलेले नाही, असे विचार मान्यवरांनी व्यक्त करून सनातन संस्थेस जाहीर पाठिंबा व्यक्त केला. अशाप्रकारे अन्याय्य बंदी घालण्याचा प्रयत्न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी इशारा देण्यात आली.



यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष भगवान महाराज कोकरे, समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी, हिंदु एकता आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक विनायक पावसकर,  पंडितदादा मोडक, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, बजरंगदलाचे धनंजय देशमुख, वाई येथील प्रखर धर्माभिमानी काशिनाथ शेलार, प्रतापगड उत्सव समितीचे  विवेक भोसले, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, करंजे पेठेतील ग्रामस्थ  दत्तात्रय देवकर, युवराज ओतारी, श्रीमती प्रगती डोंगरे,  गितांजली गोंधळेकर  उपस्थित होते. 



नगरपालिकेशेजारील आनंदवाडी दत्तमंदिर येथून मोर्चास प्रारंभ झाला. एटीएस का षड्यंत्र - नही सहेंगे । नही सहेंगे ।, आम्ही सारे सनातन-सनातन अशा घोषणांनी मोर्चेकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चात सहभागी युवक-युवतींनी सुधन्वा गोंधळेकर यांची अन्याय्य अटक रद्द करा, सच्चा धर्माभिमानी सुधन्वा गोंधळेकर, सनातनवर बंदीची मागणी हे पुरोगामी ढोंग, दाभोलकरांचे खरे मारेकरी पकडण्यापेक्षा सनातन बंदीमध्ये अंनिसला रस का?, असे फलक हातात धरून निषेध व्यक्त केला. या वेळी  सुधन्वा गोंधळेकर यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, सातारा, कराड, वाई, वडूज, खटाव, कोरेगाव, रहिमतपूर तसेच आजूबाजूच्या 25 हून अधिक गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या मोर्चानंतर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment