सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
................................................
शाहूपुरी : प्रतापगंज पेठेत चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांपैकी एका चोरट्यास सायली त्रिंबके युवतीने धाडसाने पकडून शाहूपुरी पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कारवाईची सूत्रे गतिमान करत शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तब्बल 9 दुचाकी चोरी करणारी तिघांची टोळी शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केली. यातील एकजण अल्पवयीन आहे. सायलीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विकास मुरलीधर मुळे (वय 19, रा.पॉवर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा), बाळा उर्फ सुरज किसन सकटे (वय 22, रा. सातारारोड ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, सायली त्रिंबके यांचा प्रतापगंज पेठेत ब्युटीपार्लर व्यवसाय आहे. मंगळवारी दि. 23 रोजी रात्री काही कामानिमित्त त्यांना उशिर झाल्याने त्या पार्लरमध्येच झोपी गेल्या. मध्यरात्री उशिरा त्यांना पार्लरबाहेर काहीतरी आवाज आल्याने उठून पाहिले असता बाहेर अंदाजे तीन ते पाच चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. त्यांच्यातील संवाद ऐकून त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या काही नातेवाईक व मित्रांना फोन करून तेथे बोलावून घेतले. त्यानंतर धाडसाने शटर उघडून चोरट्यांचा पाठलाग करत त्यातील अल्पवयीन मुलास पकडले. त्यानंतर तातडीने पीसीआरला फोन केल्यानंतर पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास त्या अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाईची सूत्रे गतिमान करत टोळी जेरबंद केली.
दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत टोळी जेरबंद केल्याबाबत अधिक माहिती अशी, सायली त्रिंबके या युवतीने पोलिसांना संशयितांची माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस संशयितांचा शोध घेत असताना ते राजवाडा येथे दुचाकीवर आढळले. पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून जावू लागले. पोलिसांनी संशयितांचा थरारक पाठलाग करुन पकडले.
तिघांना दुचाकीबाबत विचारले असता, ते निरूत्तर झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल 9 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेतली आहेत. आम्हाला दुचाकी चालवण्याची हौस असल्याने त्या चोरल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस हवालदार शैलेश फडतरे, अमित माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, मोहन वाघमळे, अमर काशीद, मीना गाढवे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

0 Comments