Hot Posts

6/recent/ticker-posts

कासमध्ये बोटिंगचा मानस: उदयनराजे



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.......................................
कास : कास धरणाच्या उंचीचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे . येत्या डिसेंबर अखेर घरणाचे काम पूर्णत्वाला जाईल त्यावेळी धरणात 445 दलघमी पाणी साठा झालेला असेल. हे पाणी सातारकरांना 2050 पर्यंत पुरणार आहे. या कामानंतर पॉवर हाऊस येथे जलविद्युत प्रकल्प व कासमध्ये बोटिंग कार्यान्वित करण्याचा मानस असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
उदयनराजे यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने कास तलावाचे ओटी भरणं नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, स्नेहा नलावडे, सीता हादगे, आदी उपस्थित होते . नगराध्यक्षांनी श्रीफळ व साडी अर्पण करून कास तलावाची ओटी भरली.
कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आणि कास धरण उंचीचे काम अंतिम टप्प्याकडे निघाले आहे याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले. धरणाच्या जुन्या भिंतीवरून त्यांनी आवर्जुन फेरी मारली.
प्रसार माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले कास तलावाची निर्मिती  प्रतापसिंह महाराज थोरले यांनी आपल्या खजिन्यातून केली. भौगोलिक रचनेचा अभ्यास करून कास तलाव खोदला गेला. भारतातील चेरापुंजीनंतर महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा पाऊस पडतो.
कास तलाव परिसर सह्याद्री पठाराच्या अतिसंवेदनशील पर्जन्य क्षेत्रात येतो. या मुबलक पाणीपुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे काम सुरू आहे . कास धरण तलावात 445 दलघमी पाणीसाठा होऊ लागल्यानंतर कास ते सातारा दरम्यान स्वतंत्र वितरिकांचे नियोजन करावे लागणार.
हे पाणी सातारकरांना 2050 पर्यंत पुरेल. इंटेक वेल, सांडवा मजबुतीकरण, धरणाच्या तळाची स्ट्रेस टेस्ट या कामानंतर साधारण हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाला जाईल. या कामांमध्ये हरीत लवाद, महसूल विभागाकडून बर्‍याच मान्यता व निधी मिळवावा लागत आहे.
मात्र सातारकरांसाठी ‘एक बार मैने जो कमिटमेंट कर दी तो मै अपनी आपकी भी नही सुनता’ असा भन्नाट डायलॉग उदयनराजे यांनी आपल्या सिग्नेचर स्टाईलने ऐकवला.
पॉवर हाऊस येथे जलविद्युत प्रकल्प व कास तलावात बोटिंग या दोन भविष्यकालीन प्रकल्पांचे संकेत त्यांनी दिले. सातार्‍यातील स्ट्रीट लाईटसाठी ही वीज उपयोगी येइल व पालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक ताणं कमी होईल असे उदयनराजे यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments